मुंबई : नववी आणि अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांनादेखील दहावी आणि बारावीत प्रवेश मिळू शकतो. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. “जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांना तोंडी परीक्षेची संधी देण्यात येईल. ही तोंडी परीक्षा व्हिडीओ कॉल किंवा वर्गात थेट उपस्थितीत पार पडेल”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली (Fail students can also get admission in 10th and 12th class).
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्या. राज्य सरकारने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरात झालेल्या विविध परीक्षांमधील गुणांच्या सरासरीनुसार त्यांना दहावी आणि बारावीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही विद्यार्थी नववी आणि अकरावीच्या वर्षभरातील परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीत प्रवेश मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर शिक्षण विभागाने तोडगा काढला आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
नववी आणि अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेऊन त्यांना पुढील वर्गात जाण्याची संधी दिली जाईल. तोंडी परीक्षेसाठी व्हिडीओ कॉल किंवा थेट उपस्थितीचा पर्याय आहे, असा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली (Fail students can also get admission in 10th and 12th class).
दहावीचा निकाल कधी?
“कोरोना संकटामुळे दहावीच्या भूगोलाची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. दरम्यान, या काळात कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रांवर आणि पोस्ट ऑफिसमध्ये अडकल्या होत्या. खरंतर एसएससी बोर्डाचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी चांगली कामगिरी केली. बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता दहावीचादेखील निकाल जाहीर होईल. या महिन्याअखेरीस दहावीचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न आहे”, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
हेही वाचा : बोर्डाच्या अध्यक्षांना किती टक्के गुण होते? शकुंतला काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
शाळा कधी सुरु होणार?
“15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात आलं. शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरु राहीलं पाहिजे, असा प्रयत्न होता. मुलांचं आरोग्य हे आपल्या सर्वांसाठी प्राथमिक आहे. त्यामुळे ऑनलाईन, ऑफलाईन, टेलिव्हिजन, गूगल, यूट्यूब यांच्याार्फत शिक्षण सुरु केलं. पण फिजिकल शाळा कधी सुरु करायचं हे आता सांगू शकत नाही. कारण आता ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे तेथील स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी, शिक्षण समिती, ग्रामपंचायत यांनी पालकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा”, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.