Video : लोणावळ्याच्या भूशी डॅमजवळील धबधब्यात डोळ्या देखत पाच जण वाहून गेले, महिला आणि 2 मुलींचे मृतदेह अखेर सापडले

| Updated on: Jun 30, 2024 | 8:50 PM

पावसाळ्याचे दिवस आणि रविवार साधून वर्षासहलीसाठी लोणावळ्यातील भूशी डॅम परिसरातील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या एका कुटुंबातील पाच सदस्यांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत.

Video : लोणावळ्याच्या भूशी डॅमजवळील धबधब्यात डोळ्या देखत पाच जण वाहून गेले, महिला आणि 2 मुलींचे मृतदेह अखेर सापडले
bhushi dam, lonavala
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

पुणे : मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र पावसाची मजा घेण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडत आहेत. मात्र या पावसात धरणे आणि धबधब्यांचे आकर्षण मोठे आहे. या धबधब्यामुळे अपघात देखील होऊ शकतात. ज्या जागेची आपल्याला काहीच माहीती नाही अशा ठिकाणी जाण्याचे धाडस करु नये, खोल पाण्यात उतरू नये ते प्रसंगी जीवावर बेतू शकते असे पोलीस आवाहन करीत असतात. परंतू अति उत्साही पर्यटक नको ते धाडस करतात आणि संकटाला आमंत्रण देतात. लोणावळ्याच्या प्रसिद्ध भूशी डॅमनजीक सहलीसाठी गेलेले अख्खे कुटुंबच धबधब्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील पाच जणांपैकी महिलेचा आणि दोन मुलींचा मृतदेह बचाव पथकाला सापडला आहे.

लोणावळा येथील भूशी डॅम यंदाच्या पावसाच्या मोसमात पहिल्यांदाच ओव्हर फ्लो झाल्याने येथे रविवार निमित्त पर्यंटकांची गर्दी वाढली आहे. यातील पायऱ्यांवर झोपून पर्यंटक धबधब्याच्या पाण्याचा आनंद घेत आहेत. परंतू येथील भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल पाहण्यासाठी अन्सारी कुटुंब गेले होते. त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची घटना घडली आहे. या कुटुंबाचा बचाव पथकाने घेतला असताना एका महिलेचा आणि तिच्या दोन मुलींचे मृतदेह अखेर सापडले आहेत. यातील तीन मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे.

धक्कादायक व्हिडीओ येथे पाहा –

महिला आणि मुलींचे मृतदेह सापडले

भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरात धबधबा आहे. हा रेल्वेच्या मालकीचा भाग असल्याचे म्हटले जाते. येथूनच भूशी डॅमला पाणी येते. या धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच सदस्य वाहून गेल्याचे म्हटले जात आहे. वानवडीतील सय्यदनगर परिसरात राहणारे अन्सारी फॅमिली फिरण्यासाठी येथे आले होते. भुशी धरण परिसरात त्यातील पाच जण वाहून गेल्याचे म्हटले जात आहे. यापैकी तीन जणांचे मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. यात एक महिला आणि दोन मुलींचा समावेश असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव साहिस्ता नियकत अन्सारी ( वय 36) , अमिमा आदिल अन्सारी ( वय 13) आणि  उमेश आदिल अन्सारी ( वय 8 ) असे आहे. तर बेपत्ता असलेल्या मुलांची नावे अदनान संभाहर अन्सारी ( वय 4 ) आणि मारिया अकील अन्सारी सय्यद ( वय 9) अशी आहेत. अंधारामुळे शोध कार्य थांबवण्यात आले आहे.