खेळता खेळता मुलाकडून आरोग्य सेतू अॅपमध्ये उचापती, वडिलांसह कुटुंबावर विलगीकरणात राहण्याची वेळ
आरोग्य सेतू अॅप उघडले जाऊन चुकीची माहिती भरल्याने वर्ध्यातील आर्वी येथे संपूर्ण कुटुंबाला विलगीकरणात राहण्याची वेळ आली (Misinformation in Arogya Setu App).
वर्धा : कोरोनाच्या महामारीत अनेकांना वेगवेगळे अनुभव पहायला मिळत आहेत. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले. अशातच घरातील मुलांना घरात ठेवण्यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. कुठे मुलांसोबत घरात पालक खेळताना दिसतात, तर कुठे अनेक मुले मोबाईल हाताळताना दिसत आहेत. एवढंच नव्हे तर कोरोनामुळे शिक्षण पद्धतीतही बदल होत आहेत. आता ऑनलाईन शिक्षण सुरु झाले असून मुले त्यातही मोबाईलमध्ये व्यस्त दिसत आहेत. अशातच आरोग्य सेतू अॅप उघडले जाऊन चुकीची माहिती भरल्याने वर्ध्यातील आर्वी येथे संपूर्ण कुटुंबाला विलगीकरणात राहण्याची वेळ आली (Misinformation in Arogya Setu App).
ऑनलाइन शिक्षण सुरु असताना वडिलांच्या मोबाईलमध्ये मुलाने आरोग्य सेतू अॅप उघडत त्यातील प्रश्नांची उत्तरे दिली. सर्व प्रश्नांची होकारार्थी उत्तर देताच कोरोनाच्या नियंत्रण कक्षातून याची दखल घेण्यात आली. तेथून प्रशासनाला सूचना प्राप्त झाली आणि तेथून स्थानिक प्रशासन सक्रीय होत शासकीय कर्मचारी थेट संबंधित कुटुंबाच्या घरी दाखल झाले. आरोग्य सेतू अॅपमध्ये भरलेल्या माहितीनुसार या कुटुंबाला आरोग्य विभागाने गृह विलगीकरणात ठेवले. याच दरम्यान घरातील कुटुंब प्रमुखाने प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिली. मात्र, त्यांना कोरोना नियंत्रणाच्या नियमावलीमुळे विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावीच लागली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
कोविडची लक्षणे आणि आपलं आरोग्य याबाबत वेळोवेळी नागरिकांना अचूक माहिती व्हावी यासाठी आरोग्य सेतू अॅप सुरु करण्यात आले. यामुळे प्राथमिक स्तरावरच नागरिकांना आपली लक्षणं कोरोनाची आहेत की नाही याची माहिती मिळत होती. तसेच प्रशासकीय यंत्रणांना देखील परिसरातील कोणत्या नागरिकांना कोरोना सदृश लक्षणं आहेत हे कळत होते.
आरोग्य विभागाकडून हे अॅप प्रत्येकाने इन्स्टॉल करण्याचे आवाहनही करण्यात आले. अनेक ठिकाणी तर हे अॅप बंधनकारक केल्याचंही बोललं गेलं. वर्धा जिल्ह्यात दीड लाख लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले. या अॅपच्या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत 107 लोकांना विलगीकरण करण्यात आले. मात्र, नागरिकांनी यात अचूक आणि स्वतः ही माहिती भरावी, मुलांच्या हाती मोबाईल देऊ, नये असं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले यांनी याबाबत नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं.
चुकीची माहिती भरल्यानंतर विलगीकरणात राहणाऱ्या या कुटुंबाला या निमित्ताने मुलांकडे मोबाईल देताना किती सावधानता बाळगावी याचा स्पष्ट संदेश गेला आहे. मात्र वारंवार सांगूनही मोबाईलचे व्यसन न सुटणाऱ्या मुलांबाबत अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.
हेही वाचा :
राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दोन दिवसात जवळपास 16 हजार नवे रुग्ण
कोरोनामुक्त झालेल्या पोलीस, डॉक्टरांकडून प्लाझ्मा दान, कोरोना योद्धांचे सामाजिक भान
Pune Lockdown Rules | पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद?
Misinformation in Arogya Setu App