उरण : खोपटा भेंडखळ समुद्री खाडीत लावण्यात आलेल्या वाणा प्रकारच्या मासेमारीत मत्स्यप्रेमींना हवाहवासा जिताडा मासा सापडला. भेंडखळ गावातील अरुण ठाकूर या मासेमाराला तब्बल 35 किलो वजनाचा जिताडा मासा मिळाला. करंजा गावात तब्बल 35 हजार रुपये मोजून एका खवय्याने हा मासा खरेदी केल्याची माहिती आहे. (Famous Jitada Fish Found In Uran Raigad)
‘मासळीचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिताडा माशाने लॉकडाऊनच्या काळात या मासेमाराला चांगलेच तारले असल्याचे समोर आले आहे.
रायगड जिल्ह्यातील जिताडा मासा म्हणजे अगदी पापलेट, हलव्याला देखील बाजूला ठेवणारा मासा म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या काळी तर पैशाने जी कामे होत नव्हती, ती या जिताडा माशाने अगदी लीलया होत असायची.
राज्याच्या अनेक मंत्र्यांना रायगडच्या जिताड्याची उत्सुकता असायची आणि जिताड्याच्या भेटीने अनेक कामे करुन घेतल्याची उदाहरणे पूर्वीच्या काळातील जुने राजकारणी सांगत असत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही जिताडा हा आवडीचा मासा असल्याचे म्हटले जाते. ते उरण किंवा अलिबागला आल्यावर जिताडा खाल्ल्याशिवाय त्यांचा दौरा पूर्ण होत नसल्याची वदंता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिताडा हा रायगडच्या मातीतला सर्वात प्रसिद्ध असलेला मासा म्हणून ओळखला जातो. (Famous Jitada Fish Found In Uran Raigad)
याच जिताडा प्रकारचा सर्वात मोठा मासा आज उरणच्या भेंडखळ गावातील मासेमाराला मिळाला आहे. खाडी किनारी सुमारे एक ते दोन किमीच्या परिघात काठ्या गाडून त्याला जाळे बांधले जाते आणि पूर्ण भरती झाल्यावर जाळे समुद्राच्या बाजूने काठीच्या उंचीवर उभे केले जाते. त्यामुळे जाळे आणि किनारा यांच्यामध्ये अडकलेली मासळी या वाणा प्रकारच्या खाजणी मासे पकडणीत मिळत असते.
हेही वाचा : नायगाव कोळीवाड्यात आजपासून 14 दिवसांचा कडकडीत बंद
आज पहाटे अशाच प्रकारे लावण्यात आलेल्या वाणा प्रकारच्या मासेमारीत तब्बल 35 किलो वजनाचा हा जिताडा मासा मिळून आला. हा मासा एवढा मोठा आहे की एका माणसाच्या उंचीइतका दिसतो.
मागील अनेक महिने कामधंदा नव्हता आणि मासळीही फारशी मिळत नव्हती. या पार्श्वभूमीवर आज मिळालेल्या या मोठ्या जिताडा माशाने अरुण ठाकूर या मासेमाराला लॉकडाऊनच्या काळात ‘अच्छे दिन’ आणल्याचे समोर आले.
VIDEO : Mumbai Corona Update : मुंबईतील लालबाग मार्केट आजपासून 5 दिवस बंद#Mumbai #MumbaiCorona #Lalbaug #LalbaugMarket #Band #CoronaUpdatesInIndia #COVID__19 pic.twitter.com/zqflGnNQzT
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2020