फुलांनी सजवलेली गाडी, गुलाब पुष्पांच्या वर्षावात उस्मानाबाद पोलीस अधीक्षक रौशन यांना निरोप
उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची मुंबई येथे बदली झाली आहे. त्यानंतर आज उस्मानाबाद पोलीस दलाच्या वतीने रौशन यांचा सपत्निक सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या.
उस्मानाबाद : उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची मुंबई येथे बदली झाली आहे. त्यानंतर आज उस्मानाबाद पोलीस दलाच्या वतीने रौशन यांचा सपत्निक सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. तसंच गुलाब पुष्पांचा वर्षाव करून पोलीस अधिकाऱ्यांनी परंपरेप्रमाणे गाडी ओढत, बॅन्ड पथकाच्या वाद्याच्या साथीने रोशन यांना निरोप दिला. या निरोप समारंभावेळी पावसानेही हजेरी लावली. (Farewell to Osmanabad Superintendent of Police Raj Tilak Roshan)
रौशन यांना केंद्रीय गृहमंत्री पदक
पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची उस्मानाबाद येथील कारकीर्द चांगली राहिली. त्यांना उत्कृष्ट तपासबद्दल केंद्राचे गृहमंत्री पदक मिळाले. तसेच त्यांनी केलेल्या तपासावर पुस्तक व त्यांचा कविता संग्रहही प्रकाशित झाला आहे. रौशन यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात मिसिंग केसेस ( हरवलेले व्यक्ती शोधणे) बाबत त्यांच्या कार्यपद्धतीची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे.
अनेक प्रकरणात रौशन यांचं उत्तम कार्य
रौशन यांनी तुळजापूर यात्रा अनुदान घोटाळासह अन्य प्रकरणात स्वतः लक्ष घातले होते. ‘एक गाव एक गणपती’सह ग्राम सुरक्षा दल, सुसज्ज पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाण्याची स्थापना यासह अनेक उपक्रम त्यांनी राबवले होते. रौशन यांनी यापूर्वी प्रशिक्षणार्थी काळात उस्मानाबाद जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून 2015 मध्ये काम केले होते. त्यानंतर आता त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले. 2 वेळेस उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. रौशन यांना देण्यात आलेल्या कौटुंबीक निरोप समारंभाला उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे गजानन घाडगे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.
उस्मानाबादला पहिल्यांदाच महिला पोलीस अधीक्षक
उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची बदली उपायुक्त मुंबई शहर येथे झाली आहे. त्यांच्या जागी उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक म्हणून निवा जैन या आज पदभार घेणार आहेत. जैन यांची समादेशक राज्य राखीव पोलीस बल, गट 1 पुणे येथून उस्मानाबाद पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. जैन यांच्या रूपाने उस्मानाबाद जिल्ह्याला पहिल्यांदाच महिला पोलीस अधीक्षक मिळाल्या आहेत.
रौशन यांच्या काळातील पोलिसांची कामगिरी
पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या अनेक अवैध धंदे यांना आळा घातला होता. त्यांनी बायोडिझेलच्या नावाखाली सुरू असलेल्या केमिकल विक्रीचा भांडाफोड केला होता. तसेच तुळजापूर येथील मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणातील आरोपी देवानंद रोचकरी यांना उस्मानाबाद येथून विशेष पोलीस पथक पाठवून मुंबई येथून अटक केली होती. तुळजाभवानी देवीच्या पुरातन 71 नाणे अपहार प्रकरणात त्यांनी आरोपी दिलीप नाईकवाडी यांना अटक केली. रौशन यांच्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात जातीय दंगली व इतर गुन्ह्याचे प्रमाण कमी झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोना काळात उस्मानाबाद पोलीस दलाने महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. रौशन यांच्या काळात पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे काम सुरू झाले. तर नागरिकांसाठी पोलीस दलाच्या वतीने पेट्रोल पंप सुरू करण्यात आला. महिला तक्रार निवारण केंद्र व इतर विभागाची कामगिरी चांगली राहिली. त्याचबरोबर पोलीस दलाचे आधुनिकीकरण व अद्यावत झाले.
इतर बातम्या :
‘हा तर असंगाशी संग, ठाकरेंनी नितीची तरी साथ सोडू नये’ मुनगंटीवारांचा खोचक टोला
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नियुक्ती, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा राज्य सरकारला दणका
Farewell to Osmanabad Superintendent of Police Raj Tilak Roshan