शेतकऱ्याच्या मुलाची कमाल, बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलांना वाचवणाऱ्या ‘रोबोट’चा अविष्कार
गुजरातच्या अमरेलीमधील राजुला गावात एका शेतकऱ्याच्या इंजिनिअर मुलाने अनोख्या रोबोटचा अविष्कार केला आहे. त्याने आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाचा उपयोग करुन बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलांना वाचवणारा रोबोट तयार केला.
अमरेली: घराच्या आजूबाजूला किंवा शेतात पाण्यासाठी घेतलेल्या बोअरवेलमध्ये अपघाताने लहान मुलं पडण्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. यात काही वेळा शर्तीचे प्रयत्न करुन मुलांना वाचवण्यात यश आले, तर काही घटनांमध्ये मुलांना बाहेर काढण्यात उशीर झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यूही झाला. हे सर्व लक्षात घेऊन गुजरातच्या अमरेलीमधील राजुला गावात एका शेतकऱ्याच्या इंजिनिअर मुलाने अनोखा रोबोट तयार केला आहे.
महेश आहिर या युवकाने आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाचा उपयोग करुन बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलांना वाचवणारा रोबोट तयार केला. या रोबोटचा उपयोग करुन अत्यंत कमी वेळेत मुलांना बोअरवेलच्या बाहेर काढणे शक्य होणार आहे. या रोबटला मोबाईलद्वारेच सुचना देता येतात. याद्वारे कितीही खोल बोअरवेल असेल तर त्यात हा रोबोट सहजपणे प्रवेश करतो.
या रोबोटचा निर्माता इंजिनिअर महेशने दिलेल्या माहितीनुसार, त्याने अनेकदा टीव्ही चॅनलवर लहान मुले बोअरवेलमध्ये पडल्याच्या घटना पाहिल्या होत्या. काही मुलांना शर्तीचे प्रयत्न करुन बाहेर काढले गेले, मात्र काही मुलांचा त्यात प्राण गेला. या घटनांनी महेशला विचार करायला प्रवृत्त केले. आपल्या देशात अजूनही बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलांना वाचवू शकेल असे तंत्रज्ञान विकसित झालेले नाही, याबद्दल तो नेहमीच विचार करायचा. मात्र, जेव्हा महेशने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले, तेव्हा त्याने आपल्या डोक्यातील ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी अनेक प्रयोग केले. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि त्याने सहजपणे बोअरवेलमध्ये जाईल आणि मुलांना बाहेर काढू शकेल, असा रोबोट तयार केला.
केवळ 25 मिनिटांमध्ये बोअरवेलमधील मुलाला बाहेर काढता येणार
कॅमेरा असलेला हा रोबोट केवळ 25 मिनिटांमध्ये बोअरवेलमधील मुलांना बाहेर काढू शकतो, अशी माहिती महेशने दिली आहे. हा रोबोट मोबाईलद्वारे नियंत्रित करता येत असल्याने तो वापरायलाही अगदी सहज आहे. रोबोटला असलेल्या कॅमेराच्या सहाय्याने बोअरवेलच्या आतील परिस्थितीचा अचूक अंदाज घेता येतो. मुलांच्या हालचालींचाही अंदाज यातून येतो आणि मदत कार्य अधिक सहज होते. एवढेच नाही तर या रोबोटचा उपयोग करुन बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलांपर्यंत ऑक्सिजन आणि पाणी देखील पोहचवता येते.
हा अनोखा रोबोट तयार करण्यासाठी अभियंता महेशला जवळजवळ 60,000 रुपयांचा खर्च आला आहे. यातून लहान मुलांना केवळ 25 मिनिटांमध्ये वाचवता येणार आहे. महेशने आपल्या या रोबोटचे अनेक लोकांसमोर परिक्षणही केले आहे. त्याने आपल्या या रोबोटला सरकारने प्रोत्साहित करावे, अशी मागणी केली आहे.