पुणे : अल्पावधीतच ‘चहाप्रेमीं’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘येवले अमृततुल्य चहा’ला अन्न आणि औषध प्रशासनाने दणका (FDA Action on Yewale Amruttulya Tea) दिला आहे. पुण्यातील प्रसिद्ध येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झालं आहे. केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेच्या अहवालात या चहामध्ये भेसळ असल्याचे समोर (FDA Action on Yewale Amruttulya Tea) आलं आहे.
यापूर्वीही येवले चहावर अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) येवले चहाच्या मालाचे काही नमुने जप्त केले होते. या जप्त मालाचा पहिला अहवाल चांगला आला होता. मात्र दुसऱ्या अहवालामध्ये सिथेंटिक फूड कलर आढळून आला आहे. या फूड कलरमुळे चहाला लाल रंग येतो. केंद्रीय प्रयोग शाळेने हा अहवाल दिला आहे.
यापूर्वीही अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत ‘येवले अमृततुल्य चहा’चे राज्यभरातील उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले होते. त्यामुळे चहाप्रेमी काहीसे खट्टू झाले होते. पण चहामध्ये पुन्हा भेसळ आढळल्यामुळे आता यावर कारवाई करण्यात येणार आहे.
पुण्यातून ‘येवले अमृततुल्य चहा’च्या शाखांना सुरुवात झाली. अल्पावधीतच पुणेकर चहाप्रेमींच्या मनात ‘येवले अमृततुल्य चहा’ने स्थान मिळवलं. पुणेकरांनी गौरवलेला चहा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचला. कोणत्याही वेळी चहाची तल्लफ भागवणारे ‘अमृतपेय’ पिण्यासाठी ‘चहा’त्यांची गर्दी उसळते.
‘येवले चहा’च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. कोंढवा भागातील कंपनीवर एफडीएने मागे छापे टाकले होते. तेव्हा चहाचं उत्पादन आणि विक्रीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या होत्या. आरोग्यास अपायकारक ‘मेलानाईट’ पदार्थ वापरल्याच्या संशयातून ही कारवाई त्यावेळी करण्यात आली होती.
दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दलही ‘येवले चहा’ला नोटीस बजावली हेती. या प्रकरणी ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार करण्यात आली होती. चहा तयार करण्यासाठी मिनरल वॉटर वापरलं जात असून चहामुळे पित्त होत असल्याची जाहिरात केली जात होती.