लोणावळ्याच्या मगनलाल चिक्कीच्या विक्रीवर बंदी
पुणे : लोणावळ्याच्या प्रसिद्ध चिक्की उत्पादक ‘मगनलाल’ या कंपनीला चिक्कीचे उत्पादन तसेच विक्री थांबवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. यामुळे मगनलालची प्रसिद्ध चिक्की आता एफडीएच्या पुढील आदेशापर्यंत विकली जाऊ शकत नाही, तसेच त्याचे उत्पादनही केले जाऊ शकत नाही. मगनलाल चिक्कीच्या उत्पादनामध्ये काही त्रुटी आढळल्या असून अन्न व सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याने उत्पादकांना […]
पुणे : लोणावळ्याच्या प्रसिद्ध चिक्की उत्पादक ‘मगनलाल’ या कंपनीला चिक्कीचे उत्पादन तसेच विक्री थांबवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. यामुळे मगनलालची प्रसिद्ध चिक्की आता एफडीएच्या पुढील आदेशापर्यंत विकली जाऊ शकत नाही, तसेच त्याचे उत्पादनही केले जाऊ शकत नाही. मगनलाल चिक्कीच्या उत्पादनामध्ये काही त्रुटी आढळल्या असून अन्न व सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याने उत्पादकांना नोटीस जारी करुन ही कारवाई करण्यात आली.
या संदर्भात कायद्यानुसार, अटींची पूर्तता केल्यानंतरच उत्पादन व विक्री करता येईल. अन्न व सुरक्षा मानदे कायद्याच्या कलम 55 नुसार त्रुटींची पूर्तता न केल्यास संबंधित कंपनीच्या प्रत्येक संचालकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते, असेही यात स्पष्ट करण्यात आले.
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा येथे शंभर वर्षापूर्वीपासून असलेल्या प्रसिद्ध मगनलाल चिक्कीच्या निर्मात्यांपैकी मगनलाल फूड्स प्रोडक्ट्स या कंपनीची एफडीएचे अन्न सुरक्षा अधिकारी आर. आर. काकडे यांच्या पथकाने तपासणी केली. कंपनीचे भागीदार अशोक भरत अग्रवाल यांच्या उपस्थितीत केलेल्या या तपासणी अंतर्गत काही त्रुटी आढळल्या आहेत. कंपनीने उत्पादीत केलेल्या खाद्यपदार्थांची ‘फूड्स सेफ्टी अॅन्ड स्टॅन्डर्ड अॅथॉरिटी ऑफ इंडिया’च्या (एफएसएआय) मान्यताप्राप्त प्रयोगशाळा किंवा स्वतःच्या प्रयोगशाळेत तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. मात्र, मगनलाल कंपनीने उत्पादित खाद्यपदार्थांची कुठलीही चाचणी, तपासणी केली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हे खाद्यपदार्थ मानवी सेवनास सुरक्षित असल्याची कुठलीही खात्री किंवा हमी नसल्याने विक्रीसाठी उत्पादित केलेला कोणताही खाद्यपदार्थ हा मानवी सेवनासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासल्याशिवाय त्याची विक्री करू नये असे आदेश दिले आहेत.
त्यामुळे आता मगनलाल फूड्स प्रोडक्ट्स कंपनीला त्यांच्या चिक्कीची मान्यताप्राप्त प्रयोगशाळा किंवा स्वतःच्या प्रयोगशाळेत तपासणी करुन ती मानवी सेवनास सुरक्षित असल्याची खात्री केल्यावरच पुन्हा विक्री करता येईल.