चांगली आणि सकस मिठाई मिळते का?, मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडून स्वीटमार्ट-हॉटेल्सची तपासणी
नागरिकांना शुद्ध व चांगली मिठाई व फराळ मिळतो का याची तपासणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी नुकतीच केली
बुलढाणा : सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून बाजारामध्ये मिठाईची व फराळाची दुकाने लागली आहेत. या दुकानांमधून नागरिकांना शुद्ध व चांगली मिठाई व फराळ मिळतो का याची तपासणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नुकतीच केली. (FDA minsiter Rajendra Shingane Visit Sweet mart And hotels)
बुलढाणा शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, कारंजा चौक, बाजार गल्ली येथील 12 ते 15 खाद्य पदार्थाचे स्टॉल व स्वीट मार्टची यावेळी तपासणी केली. यामध्ये खाद्यपदार्थावर निर्माण तारीख, खाण्यास योग्य असल्याची अंतिम तारीख, परवाना, खाद्य पदार्थ झाकून ठेवले आहे किंवा नाही, पदार्थ बनविणारे कारागीर हातांची स्वछता राखतात की नाही, ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ बनविले जातात त्याठिकाणी स्वच्छता आहे की नाही याची तपासणी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. शिंगणे यांनी केली.
ज्या दुकानदारांनी नियमांचे पालन केलेले नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ऐन दिवाळीच्या दिवशी स्वतः मंत्र्यांनी सुरू केलेल्या या धडक कारवाई मुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये जरब बसणार आहे.
“जनतेला सकस आणि चांगले अन्न दिवाळीच्या काळात मिळाले पाहिजे याकडे पूर्णपणे लक्ष देण्यात येत आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण बाबींवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांची दिवाळी सुरक्षित साजरी व्हावी यासाठी शासन दक्ष आहे”, असं मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले.
“सणासुदीच्या काळात मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मोठी मागणी असते. मात्र काही लोक पैशाच्या लालसेपोटी भेसळयुक्त खाद्यपदार्थ्यांची विक्री करुन नागरिकांच्या जीवाशी खेळत असतात. अशा समाजकंटकांवर देखील अन्न आणि ओषध प्रशासन लक्ष ठेवून आहे”, असंही शिंगणे यांनी सांगितलं.
(FDA minsiter Rajendra Shingane Visit Sweet mart And hotels)
संबंधित बातम्या
मंत्री राजेंद्र शिंगणे यांची मेडिकलवर धाड, ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार रोखण्यासाठी धडक
पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे