गडचिरोलीत 2 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक, दोन संचालकांना अटक
दुप्पट परतावा देण्याच्या नावाखाली गडचिरोलीमध्ये ग्राहकांची 2 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झालाय.
गडचिरोली : दुप्पट परतावा देण्याच्या नावाखाली गडचिरोलीमध्ये ग्राहकांची 2 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झालाय (Financial Fraud in Gadchiroli). संबंधित कंपनीकडून पूर्व विदर्भात 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणात फसवणूक करणाऱ्या ‘सनशाईन कंपनी’च्या दोन संचालकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
आरोपी रमेशचंद्रसह इतर 8 जणांनी सनशाईन हायटेक इन्फ्राकॉम कंपनी स्थापन केली. या कंपनीची एप्रिल 2012 मध्ये गडचिरोली येथेही शाखा उघडण्यात आली. नागरिकांकडून रक्कम गोळा करण्यासाठी 51 एजंट नेमण्यात आले होते. या एजंटने अनेक ठेवीदारांना कमी कालावधीत दुप्पट रक्कम देण्याचं अमिष दाखवलं. यानंतर जिल्ह्यातील 2 हजार 137 ठेवीदारांनी या कंपनीत 2 कोटी 29 लाख 3 हजार 490 रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, ऑक्टोबर 2015 मध्ये या कंपनीने कार्यालय बंद करुन ठेवीदारांची रक्कम परत केली नाही.
फसवणूक झाल्याचं लक्षात येताच ठेवीदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. ठेवीदारांच्या तक्रारीनुसार गडचिरोली पोलिसांनी कंपनीच्या संचालकांविरूध्द गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रामचंद्र नायक आणि किसनलाल मेरावत या दोन आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक उल्हास भुसारी यांनी दिली.
Financial Fraud in Gadchiroli