चंद्रपूर कोळसा घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल, बड्या चेहऱ्यांचा पर्दाफाश होणार?
कोळसा वाहतुकदारांकडून होणारा घोटाळा लक्षात आल्यानंतर पोलिसांनी 7 दिवस या प्रकरणाचा तपास करुन गुन्हा दाखल केला.
चंद्रपूर : लघु आणि मध्यम उद्योगांना मंजूर झालेल्या कोळशाची काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशीनंतर अखेर गुन्हा दाखल केला आहे (Chandrapur coal scam). यात अनेक बड्या चेहऱ्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. कोळसा वाहतुकदारांकडून होणारा हा घोटाळा लक्षात आल्यानंतर पोलिसांनी 7 दिवस याचा तपास केला.
चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत लघू आणि मध्यम उद्योगांसाठी कोळसा वाहतूक करणारे 25 ट्रक पकडले होते. हे ट्रक उद्योगांच्या नावावर खाणीतून चांगल्या प्रतीचा कोळसा उचलायचे. मात्र, तो उद्योगांना न पुरवता खासगी प्लॉटवर उतरवायचे. या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा कोळसा भरून तो संबंधित उद्योगांना पाठवला जात होता. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू होता.
चांगला कोळसा खुल्या बाजारात विकून दुप्पट पैसे कमावण्याचा हा धंदा चंद्रपुरातील काही कोळसा व्यापारी अनेक दिवसांपासून करत आहेत. मात्र, आजवर या व्यापाऱ्यांना राजकीय वरदहस्त असल्यानं पोलिसही कारवाईसाठी धजत नव्हते, असा आरोप होत आहे. या घोटाळ्यात कोट्यावधींची उलाढाल होते. खनिकर्म विकास महामंडळातर्फे लघु आणि मध्यम उद्योगांना सबसिडीच्या दारात कोळसा मिळतो. मात्र हा कोळसा या उद्योगांपर्यंत पोचतो की नाही, याची शहानिशा महामंडळाकडून कधीही केली गेली नाही. त्यामुळं उद्योगांसाठी वाहतुकीचं काम सांभाळणारे कंत्राटदार ही चोरी खुलेआम करतात, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पकडण्यात आलेला कोळसा यवतमाळ जिल्ह्यातील बंद पडलेल्या ‘रोशन लाईन ईन वर्क’ या लघु उद्योगाला देण्यात येणार होता. एकूण 25 ट्रक राज्यातील 7 उद्योगांना पोचवायचा होता. वाहतुकीचं कंत्राट कैलाश अग्रवाल यांना मिळालं होतं. पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानं कोळसा घोटाळ्यात कुणकुणाचे हात काळे झाले आहेत, हे बाहेर येण्याची शक्यता वाढली आहे. अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नाही, याबद्दल नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Chandrapur coal scam