महिला दिन विशेष : शंकरपटाचा थरार सांभाळणारी पहिली धुरकरी
बुलडाणा : शंकरपट हा मर्दानी मैदानी खेळ म्हणून ओळखला जातो. भल्याभल्यांची या खेळात भाग घेताना भंबेरी उडते. शंकरपटात बैलांची शर्यत पाहताना अंगावर रोमांच उभा राहतो. तर डोळ्यासमोर उभे राहतात बैल आणि रिंगी हाकणारा रांगडा धुरकरी. मात्र या पुरुषप्रधान खेळाला बुलडाणाच्या सीमा पाटील यांनी आव्हान दिलं आहे. विदर्भाच्या कन्येने शंकरपटात भाग घेऊन बैल हाकणारी पिहली मर्दानी […]
बुलडाणा : शंकरपट हा मर्दानी मैदानी खेळ म्हणून ओळखला जातो. भल्याभल्यांची या खेळात भाग घेताना भंबेरी उडते. शंकरपटात बैलांची शर्यत पाहताना अंगावर रोमांच उभा राहतो. तर डोळ्यासमोर उभे राहतात बैल आणि रिंगी हाकणारा रांगडा धुरकरी. मात्र या पुरुषप्रधान खेळाला बुलडाणाच्या सीमा पाटील यांनी आव्हान दिलं आहे. विदर्भाच्या कन्येने शंकरपटात भाग घेऊन बैल हाकणारी पिहली मर्दानी महिला धुरकरी म्हणून मान मिळवला आहे.
सीमा पाटील यांनी पुरुष प्रधान संस्कृतीला आव्हान दिलं. सीमा यांनी शंकरपटात भाग घेत आज उत्कृष्ट कामगिरी त्यांनी शंकरपटात केली. त्यांनी या खेळात आतापर्यंत शेकडो शंकरपट गाजवले आहेत. तब्बल 21 वेळा त्यांनी प्रथक क्रमांकाचे पारितोषिकही मिळवले आहेत. सीमा पाटील या 45 वर्षाच्या आहेत. वयाच्या 20 व्या वर्षी सीमा पाटील यांनी आपल्या घरातील बैल पवन आणि जीवन यांच्या जोडीने शंकरपटात भाग घेतला होता. मात्र आज 30 वर्षे लोटली आणि सीमा पाटील या शंकरपटातील केवळ मानकरी न ठरता शंकरपटाच्या पुरुषप्रधान अहंकाराला तडा देणारी पहिली महिला म्हणून प्रकाशझोतात आली आहे.
सीमा पाटील लहान असताना आपल्या वडिलांसोबत शंकरपट पाहायला जात होत्या. याच दरम्यान त्यांना या खेळाबद्दल आवड निर्माण झाली. वडिलांसोबत खेळ पाहायला जाताना सीमा यांना अनेक टोमणेही ऐकायला मिळत होते. “हा मर्दानी खेळ आहे, महिलेला नाही जमायचा” असे टोमणे मारले जात होते. हे शब्द सीमाताईंच्या जिव्हारी लागले आणि त्यांनी या पुरुषी अहंकाराला आव्हान देण्याचा निर्धार केला. यामध्ये त्यांना साथ फक्त जीवन आणि पवन याच बैलजोडीने दिली. दरम्यान शेतातच त्यांनी रिंगीवर बैलांना पळवण्याचा सराव सुरु केला. त्यानंतर त्यांनी शंकरपटात भाग घ्यायचे ठरवले. यावेळी त्यांना टीकाही सहन करावी लागली.
विशेष म्हणजे शंकरपटाची आवड असलेल्या सीमा यांना लग्नानंतर त्यांच्या पतीकडून हा खेळ खेळण्यास विरोध होऊ लागला. या खेळामुळे त्यांचा एका वर्षात घटस्फोट झाला. मात्र, न डगमगता त्यांनी उत्कृष्टपणे शंकरपट गाजवला आणि विदर्भाला सर्वोच्च मान मिळवून दिला. तेव्हापासून आजतागायत म्हणजे गेल्या 30 वर्षांपासून त्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आयोजित शंकरपटात सहभागी होत आहेत. चांगल्या कामगिरीसाठी त्यांना आतापर्यंत 26 ठिकाणी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच त्यांना विदर्भकन्या म्हणून पुरस्कारितही करण्यात आलं आहे.
शंकरपटातल्या खेळाशिवाय सीमा पाटील यांनी अनेक सामाजिक उपक्रमातही सहभाग नोंदवला आहे. सीमा पाटील यांना महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सदस्य म्हणून स्थान देण्यात आलं आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या त्या सदस्य आहेत. त्यांना गावात मानाचे स्थान आहे. महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नसताना शंकरपटातली जागा त्यांनी भरून काढली आहे. मात्र एव्हढे असतानाही शासनाने साधी दखल घेतली नसल्याची खंत आजही त्यांना सलते. यासोबतच त्यांना शासकीय योजना कोणतीही मिळाली नसून त्यांच्या बैलांसाठी त्यांनी 4 वेळा अर्ज केला असून गोठा मिळाला नसल्याचे त्या सांगतात.