गोदावरीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, गंगापूर पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने पाण्याची पातळी वाढली आहे.
नाशिक : शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, गंगापूर पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने पाण्याची पातळी वाढली आहे.
नाशकात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. या पाण्यात गाड्या अडकल्याच्या घटनाही घडत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे काम केल्याचे सगळे दावे वाहून गेले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाने नाशिकमध्ये मुक्काम ठोकला आहे. शनिवारी रात्रीनंतर पावसाचा जोर अधिक वाढला. तसेच, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्येही रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे.
जिल्ह्यात रविवारी सकाळी साडेआठपर्यंत 24 तासांत 644 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये 135 मिलीमीटर, इगतपुरीत 170 मिमी पाऊस झाला आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतो आहे. गंगापूर धरण समूहाचे हे पाणलोट क्षेत्र असून या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. तसेच गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली असून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अचानक वाढलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, यामध्ये काही ठिकाणी गाड्या अडकल्याचं बघायला मिळालं. रोकडोबा मैदानात परिसरात रात्री पार्क केलेली गाडी अचानक पाण्याखाली अडकल्याने आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.
नदी-नाल्यांची सफाई न झाल्याने शहरात पावसाचं पाणी साचलं असं सामाजिक कार्यकर्ते आणि जलतज्ञ देवांग जानी यांनी सांगितलं. पावसाळ्यापूर्वी कामं न झाल्याने पहिल्या पावसातच महापालिका प्रशासनाचे दावे खोटे ठरल्याचा आरोप देखील जानी यांनी केला.
पाहा व्हिडीओ :