आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन

| Updated on: Nov 23, 2020 | 8:00 PM

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन झालं आहे. आसामचे आरोग्य मंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी ही माहिती दिली आहे. (Tarun Gogoi passes away)

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन
Follow us on

गुवाहटी: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (Tarun Gogoi) यांचं निधन झालं आहे. आसामचे आरोग्य मंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर तरुण गोगोई यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. त्यानंतर गोगोई यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तरुण गोगोई यांनी आसाममध्ये सलग तीन टर्म मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले होते. काँग्रेसमध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य पातळीवर महत्वाच्या पदांवर काम केले होते.  (Former Assam CM and Congress leader Tarun Gogoi passes away)

माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना GMCH रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गोगोई यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र डॉक्टरांना यश आले नाही.

आसाममध्ये सलग तीन टर्म मुख्यमंत्री

तरुण गोगोई हे 25 ऑक्टोबरला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. कोरोनावर मात केल्यानंतर 2 नोव्हेंबरला त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. तेव्हापासून गोगोई यांच्यावर GMCH रुग्णलयात उपचार सुरु आहेत. तरुण गोगोई हे 2001 ते 2016 पर्यंत सलग तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे वयाच्या 86 व्यावर्षी निधन झाले. आसामध्ये ते 2001 ते 2016 पर्यंत सत्तेत होते. सलग तीन टर्म सत्तेत असणाऱ्या गोगोई यांची राजकीय कारकीर्द पन्नास वर्षांपेक्षा जास्त होती. तरुण गोगोई यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले आहे.  (Former Assam CM and Congress leader Tarun Gogoi passes away)

आसाम विधानसभेच्या 2021 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपविरोधात विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याचा तरुण गोगोईंचा प्रयत्न होता. तरुण गोगोईंच्या नेतृत्वात काँग्रेसनं आसमाममध्ये 2001, 2006 आणि 2011 मध्ये विजय मिळवला होता. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत तरुण गोगोई तिटाबार विधानसभा मतरादसंघातून विजयी झाले पण काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यांकडून शोक व्यक्त

तरुण गोगोई अवघ्या काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाले होते. मात्र यानंतर त्यांची प्रकृती पु्न्हा बिघडली होती. यामुळे त्यांना गुवाहाटी मेडिकल महाविद्यालयातील रुग्णालयामधील व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं. त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरु होते. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. तरुण गोगोई यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तरुण गोगोई यांना श्रद्धांजली

तरुण गोगोई हे लोकप्रिय नेते आणि कुशल प्रशासक होते. केंद्र आणि आसामच्या राज्य सरकारमध्ये त्यांना कामकाजाचा अनुभव होता. गोगोई यांच्या कुटुंबीयांसोबत दुख:द प्रसंगी असल्याचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नरेंद्र मोदी यांनी तरुण गोगोई यांना आंदरांजली वाहिली.

तरुण गोगोई यांची उणीव जाणवेल: राहुल गांधी

तरुण गोगोई खरेखुरे काँग्रेस नेते होते. गोगोई यांनी त्यांचे जीवन आसाममधील सर्व समाजाच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी अर्पण केले. तरुण गोगोई माझे शिक्षक होते. माझ्या मनात तरुण गोगोई यांच्याबद्दल प्रेमाची आणि आदराची भावना होती, अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या. तरुण गोगोई यांची कायम उणीव जाणवेल, असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

शरद पवार यांचे ट्विट

आसामाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते तरुण गोगोई यांच्या निधनामुळं दु:ख झाल्याची भावना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तरुण गोगोई यांच्या कुटुंबीयां प्रती शरद पवार यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

संबंधित बातम्या: 

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोईंची प्रकृती चिंताजनक, कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती बिघडली, आयसीयूत दाखल

(Former Assam CM and Congress leader Tarun Gogoi passes away)