माजी आमदार अमर राजूरकर यांचा काँग्रेसचा राजीनामा, काँग्रेसला धक्यावर धक्के
माजी आमदार अमर राजूकर यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नाना पटोले यांना पत्र लिहून हा राजीनामा दिला आहे.
मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरलेली नसतानाच आता काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला आहे. माजी आमदार अमर राजूकर यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नाना पटोले यांना पत्र लिहून हा राजीनामा दिला आहे.
राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहेत. ते नांदेड येथील असून राजीनाम्यानंतर सध्या ते अशोक चव्हाण यांच्यासोबत आहेत अशी माहिती समोर आली आहे. ( अशोक चव्हाण) साहेबांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे मी माझ्या सर्व पदांचा राजीनामा देऊन साहेबांना भेटाया आलो आहे, असे राजूरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
काय म्हटलं आहे पत्रात ?
मी आज दिनांक 12/02/2024 पासून अध्यक्ष, नांदेड शहर ( जिल्हा) काँग्रेस कमिटी व उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदे काँग्रेस कमिटी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करीत आहे. धन्यवाद. असं अमरनाथ राजूरकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
नार्वेकरांची भेट, मग नॉट रिचेबल नंतर थेट राजीनामा..
मागच्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण काँग्रेस पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा होती. सोमवारी सकाळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. तेव्हा राजीनामा देण्याची प्रक्रिया समजून घेतली. त्यांनी नार्वेकरांची भेट घेतल्याचे समजताचा राजकीय वर्तुळात खळबळ माजली. नंतर मात्र अशोक चव्हाण हे बराच काळ नॉट रिचेबल होते. दुपारच्या सुमारास थेट त्यांच्या राजीनाम्याचीच बातमी समोर आली.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक पत्र लिहीत चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला.