तेलंगणातील धरणाचे 84 दरवाजे उघडल्याने गडचिरोलीत हाहाःकार
दोन्ही राज्यातील सरकारसोबत महाराष्ट्र सरकारने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किमान काही संपर्क तरी केलाय का, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत. कारण, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या पाण्यामुळे गडचिरोलीतील पाणी वाढतच आहे. त्यात महाराष्ट्र सरकारने अजून पूरस्थितीही जाहीर केलेली नाही.
गडचिरोली : गेल्या 25 वर्षांचा विक्रम मोडणाऱ्या पावसाने गडचिरोली जिल्ह्यात भीषण (Gadchiroli flood Telangana dam) पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच तेलंगणा आणि छत्तीसगडमधून येणाऱ्या पाण्यामुळे (Gadchiroli flood Telangana dam) ही परिस्थिती अजूनच गंभीर होत आहे. या दोन्ही राज्यातील सरकारसोबत महाराष्ट्र सरकारने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किमान काही संपर्क तरी केलाय का, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत. कारण, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या पाण्यामुळे गडचिरोलीतील पाणी वाढतच आहे. त्यात महाराष्ट्र सरकारने अजून पूरस्थितीही जाहीर केलेली नाही.
वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीजवळ
गेल्या सात दिवसांपासून भामरागडचा 70% भाग पाण्यात आहे. सोमवारीही पर्लाकोटा मार्ग बंद असून सातव्या दिवशी पुराचे पाणी ओसरू लागलं. पण खोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे सोडण्यात आल्याने पाणी आणखी वाढलं. खोसीखुर्द धरणाचं पाणी वैनगंगा नदीत येऊन मिळतं.
सध्या वैनगंगा धोका पातळीच्या जवळ जात आहे. छत्तीसगड राज्यातील जगदलपूरहून इंद्रावती नदीत पाणी सोडण्यात आलंय. इंद्रावती पातागुडम, भामरागड तालुक्यात प्रवेश करते. पाणी वाढल्यास भामरागड तालुक्याला पुन्हा एकदा पुराचा तडाखा बसू शकतो.
मेड्डीगट्टा धरणाचे 84 दरवाजे उघडले
तेलंगणामधील मेड्डीगट्टा धरणाचे 84 दरवाजे उघडल्याने 9 लाख 70 हजार क्युसेकने पाण्याचा निसर्ग होत आहे. हा विसर्ग गोदावरी नदी पात्रात होत असल्याने गोदावरीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय. याचमुळे पुढे इंद्रावती नदीतही पाणी वाढण्याची भीती आहे.
गोदावरी नदी गडचिरोली जिल्ह्यात सिरोचा तालुक्याला लागते. मेड्डीगट्टा धरणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसाच होत आहे. रविवारी अचानक धरणाचं पाणी सोडल्याने 500 मेंढ्या तेलंगणातील पंकेना येथे अडकल्या. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यास गडचिरोली पोलीस आणि वन विभागाला यश आलं.
अजूनही पूरग्रस्त भाग जाहीर नाही
दुसरीकडे वैनगंगा नदी आष्टी गावाहून अहेरी तालुक्यातील काही गावाच्या सीमेवरून वाहते. इंद्रावती ही पतागुडमहून भामरागड, एटापल्ली तालुक्यापर्यंत वाहणारी नदी आहे. या परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्याला विविध नद्यांनी वेढा दिलाय. गेल्या सात दिवसांपासून पूरस्थिती असूनही हा भाग पूरग्रस्त जाहीर झालेला नाही. या पुरात शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहेत, घरातलं धान्य नाहीसं झालंय, तर घरांचीही पडछड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या पूरग्रस्तांना शासकीय मदत मिळणार का हा मोठा प्रश्न आहे.