गडचिरोली : नक्षलविरोधी पोलीस आणि सी-60 कमांडोंनी गडचिरोलीत नक्षली कॅम्प (Gadchiroli police attack on naxalite) उद्ध्वस्त केले. पोलिसांनी केलेल्या या हल्ल्यात दोन ते तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच इतर काही जखमी असल्याचे बोललं जात आहे. घटनास्थाळी मोठ्या प्रमाणात चार बंदुकांसह मोठा शस्त्रसाठा आणि जीवनावश्यक वस्तू जप्त (Gadchiroli police attack on naxalite) करण्यात आल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा गड असणाऱ्या अबुझमाड जंगलात नक्षली कॅम्प असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीद्वारे पोलीस पथकांनी पोलीस महानिरीक्षक महादेव तंबाडे आणि पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनानुसार नक्षली कॅम्पवर हल्ला केला. यावेळी नक्षल्यांनीही पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे दोन तास चकमक सुरु होती. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी पळ काढला.
पीएलजी पीपल्स वॉर आर्मी या नक्षली संघटनेचा 2 डिसेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत बंद सप्ताह होता. त्यासाठी छत्तीसगड सिमावर्ती भाग असलेल्या या क्षेत्रातून मोठ्या संख्येत नक्षली सभेसाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच गडचिरोली जिल्ह्यात मोठी घटना घडविण्याच्या उद्देशाने हा कॅम्प भरवण्यात आल्याचे म्हटलं जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलिसांकडून नक्षलीविरोधात ऑपरेशन केले जाते. पण अबुझमाड जंगलात ऑपरेशन करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. या ठिकाणी पोलिसांनी यशस्वीपणे ऑपरेशन केल्यामुळे पोलीस विभागाचे कौतुक केले जात आहे.