बाजूने बोललं तर ठीक, अन्यथा घरात घुसून खेचणार का? महाजनांचा सवाल
"तुमच्या बाजूने बोललं तर ठिक, अन्यथा घरात घुसून खेचणार का? " असा सवाल राज्याचे माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.
मुंबई : “तुमच्या बाजूने बोललं तर ठीक, अन्यथा घरात घुसून खेचणार का? ” असा सवाल राज्याचे माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर उपस्थित केला. तसेच, राष्ट्रवादीकडे गृहखातं असूनही अर्णव गोस्वामी यांच्या अकटेवर राष्ट्रवादी काहीही बोलताना दिसत नाही; असे म्हणत राष्ट्रवादीची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
“राज्यात सध्या लोकशाहीची गळचेपी सुरु आहे. सरकारच्या बाजूने बोललं तर ठीक अन्यथा घरातून खेचून नेणार हे योग्य नाही. राज्यात सध्या आणीबाणी सदृश परिस्थिती आहे.” असं ते म्हणाले. तसेच, देशात भाजपच्या लोकांबद्दलही बोललं जातं, त्यांच्यावरही टीका होते. पण आम्ही असं वागत नाही. राज्यात गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, राष्ट्रवादी यावर काहीही बोलताना दिसत नाही. राष्ट्रवादीची ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप महाजन यांनी केला.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी आज (4 नोव्हेंबर) अटक केली. 2018 मध्ये अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती. या प्रकरणात गोस्वामी यांना अटक झाली आहे. या अटकेनंतर रायगड पोलीस आणि राज्य सरकारवर विरोधककांकडून जोरदार टीक होत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत 26 मे 2020 रोजी सांगितलं होते की, “आज्ञा नाईक (अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी) यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत, अशी तक्रार केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.” त्यानंतर आज अर्णव गोस्वामी यांना अटक झाली.
काय आहे प्रकरण ?
अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक (84) त्यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं.
संबंधित बातम्या :
अर्णव गोस्वामींच्या अटकेवर सोनिया गांधी आणि पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, आशिष शेलारांचं आवाहन
पोलीस आजपर्यंत झोपले होते का? अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील बरसले