गिरीश महाजनांनी अपघातग्रस्ताला स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात नेलं
अहमदनगर : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील माणुसकीचे आज पुन्हा एकदा दर्शन घडले. एका अपघातात जखमी झालेल्या तरुणाला गिरीश महाजन यांनी मदत केली. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी राळेगणसिद्धीला जात असताना रस्त्यात अपघातग्रस्त तरुणाला त्यांनी स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवले. नगरजवळ पांढरी पूल परिसरात ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झाला होता, तो तरुण […]
अहमदनगर : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील माणुसकीचे आज पुन्हा एकदा दर्शन घडले. एका अपघातात जखमी झालेल्या तरुणाला गिरीश महाजन यांनी मदत केली. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी राळेगणसिद्धीला जात असताना रस्त्यात अपघातग्रस्त तरुणाला त्यांनी स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवले.
नगरजवळ पांढरी पूल परिसरात ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झाला होता, तो तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला मदतीची वाट बघत पडलेला होता. तेथे उपस्थित नागरिकांनी मदतीसाठी 108 वर संपर्क केला होता, मात्र बराच वेळ होऊनही रुग्णवाहिका आली नव्हती.
गिरीश महाजन हे औरंगाबादहून अहमदनगरमधील राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी जात होते. वाटेत त्यांना नगरजवळ लोकांची गर्दी दिसली. ही गर्दी बघून जलसंपदा मंत्र्यांचा ताफा थांबला. तेव्हा गिरीश महाजन यांना घडलेला प्रकार समजला. त्यांनी कुठलाही विचार नकरता, जराही वेळ न घालवता त्या जखमी तरुणाला आपल्या गाडीत बसवलं. त्यानंतर त्या तरुणाला थेट नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. इतकंच नाही तर गिरीश महाजन यांनी जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक यांना तरुणावर तातडीने उपचार करण्यास सांगितलं. त्यानंतर ते पुढील दौऱ्यावर निघून गेले.
पाहा व्हिडीओ :