REVIEW : नच्याची ‘गर्लफ्रेण्ड’ लय भारी !
सोशल मीडियाच्या प्रवाहात वाहत चाललेल्या आजच्या युवा पिढीमध्ये गर्लफ्रेण्ड असणं हे अगदीच प्रतिष्ठेचं मानलं जातं. ज्याला गर्लफ्रेण्ड नाही त्याने आयुष्यात खूप काही मोठं पाप केलंय अशा आर्विभावानं त्याच्याकडे बघितलं जातं. लेखक-दिग्दर्शक उपेंद्र सिधयेने आपल्या पहिल्याच सिनेमात तरुणाईला भावणारा हटके विषय निवडलाय.
सोशल मीडियाच्या प्रवाहात वाहत चाललेल्या आजच्या युवा पिढीमध्ये गर्लफ्रेण्ड असणं हे अगदीच प्रतिष्ठेचं मानलं जातं. ज्याला गर्लफ्रेण्ड नाही त्याने आयुष्यात खूप काही मोठं पाप केलंय अशा आर्विभावानं त्याच्याकडे बघितलं जातं. लेखक-दिग्दर्शक उपेंद्र सिधयेने आपल्या पहिल्याच सिनेमात तरुणाईला भावणारा हटके विषय निवडलाय. त्यामुळे नच्याची ही गर्लफ्रेण्ड बघितल्यावर मन खरंच तृप्त होतं. अनेकांना आपण कॉलेजच्या दिवसातील नचिकेत प्रधान तर नव्हतो ना ? हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. स्मार्ट फोनच्या जमान्यात स्टेट्स सिंगल असणं म्हणजे मस्करीचा विषय ठरतो. एखाद्या तरुणाच्या आयुष्यात गर्लफ्रेण्डचं नसेल तर त्याच्या आयुष्यात काय गंभीर, गंमतीशीर प्रसंग घडतात हे उत्तम पध्दतीनं या सिनेमात दाखवण्यात आलंय. दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्याच सिनेमात उपेंद्रने ‘ट्वेंटी ट्वेंटी’ सामना खेळलाय. मुळात त्याचं व्हिजन क्लिअर असल्यामुळे ही गर्लफ्रेण्ड सगळ्यांनाच हवीहवीशी वाटणारी आहे. बऱ्याच दिवसांनी मराठीत एक उत्तम रोमकॉम चित्रपट आलाय. चित्रपटाची निर्मिती मुल्य असो वा मांडणी सगळंच चकाचक आहे.
चित्रपटाची कथा आहे नचिकेत प्रधानची (अमेय वाघ). व्हॅलेंटाईन डेला वाढदिवस असूनही नचिकेत ‘प्यार का मारा’ असतो. त्यामुळेच फॅमिली, ऑफिस, मित्र सगळीकडेच नचिकेत चेष्टेचा विषय असतो. अहो एवढंच काय तर गर्लफ्रेण्ड नाही म्हणून नचिकेतचा बॉस दांडेकर (सागर देशमुख) चक्क त्याला प्रमोशन नाकारतो. असंख्य गंभीर विषय असले तरी नचिकेत प्रधानला गर्लफ्रेण्ड नाही हा जणू ‘नॅशनल इश्यू’ असल्यासारखं भासवण्यात आलंय. आता असा सगळा मामला सुरु असतांना नचिकेत एक भन्नाट शक्कल लढवतो आणि त्याच्या आयुष्यात येते आलीशा नेरुरकर (सई ताम्हणकर). आता नचिकेत काय शक्कल लढवतो ? आलिशा नेमंकी कोण असते ? ति नचिकेतच्या आयुष्यात कशी काय येते ? शेवटी नच्याला गर्लफ्रेण्ड मिळते का ? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ‘गर्लफ्रेण्ड’ बघितल्यावर मिळतील.
सिनेमाची वन लाईन कन्सेप्ट मस्त आहे. दिग्दर्शकानं ति फुलवलीही मस्त आहे. सिनेमा बघतांना नचिकेत प्रधान आपल्याच आयुष्यातला एक भाग वाटतो. हा नच्या कधी तुम्हाला हसवतो, कधी रडवतो, तर कधी विचार करायला भाग पाडतो. सोशल मीडियाचा वाढता अतिरेक घातकही ठरु शकतो हे या सिनेमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सिनेमाचा फर्स्ट हाफ तर भन्नाट झालाय. सिनेमाची सुरुवातचं 14 फेब्रुवारी अर्थात नचिकेतच्या वाढदिवसानं होते. नचिकेतला गर्लफ्रेण्ड नसणं, त्याचा धांदरटपणा, गर्लफ्रेण्ड नसणं म्हणून सतत त्याला डिवचलं जाणं या गोष्टींचा अतिरेक झाला असून सुरुवातीची काही मिनिटं उगाच त्यावर खर्च केली असल्याचं जाणवतं. पण नचिकेतचं कॅरेक्टर उलगडण्यासाठी हा वेळ घेतला असेल असा समज जर का तुम्ही केला तर नक्कीच त्या सिक्नेनसमध्येही तुम्हाला आनंद मिळेल. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तिथल्या कर्मचाऱ्याला गर्लफ्रेण्ड आहे की नाही याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणं, तिथल्या कर्मचाऱ्यांनी नचिकेतला सतत हिणवणं, हे कमी की काय म्हणून गर्लफ्रेण्ड नाही म्हणून बॉसनं प्रमोशन नाकारणं हे न पटण्यासारखं आहे. पण आता नचिकेत आणि त्याच्या गर्लफ्रेण्डच्या प्रेमात तुम्ही पडले असाल तर याही गोष्टीकडे तुम्ही मनोरंजन म्हणून कानाडोळा करु शकता. मध्यंतरानंतर खरी मजा आहे. एका धक्कादायक वळणावर सिनेमाचा मध्यांतर होतो. त्यामुळे आता पुढे काय हा विचार त्या मधल्या 15 मिनिटात सातत्यानं तुमच्या मनात घोळत राहतो आणि त्याच धक्कादायक वळणावर सिनेमा मध्यंतरानंतर सुरु होतो. मध्यंतरानंतर आलिशा आणि नच्याची प्यारवाली लव्हस्टोरी ट्रॅकवर यायला सुरुवात होते. आलिशा नेमकी कोण हे कळतं. सेकंड हाफमध्ये सिनेमावर दिग्दर्शकानं उत्तम पकड ठेवलीय. परंतु एवढं सगळं छान छान मामला सुरु असतांना परत एकदा सिनेमाचा शेवट थोडा ताणल्यासारखा वाटतो. जर तो आटोपशीर घेतला असता तर सिनेमाचा नक्कीच अजून चांगला प्रभाव पडला असता.
सई ताम्हणकर आणि अमेय वाघ ही हटके जोडी या सिनेमात काम करणार हे जाहीर झालं तेव्हापासूनच या सिनेमाबदद्ल उत्सुकता निर्माण झाली होती. सई आणि अमेयची भन्नाट जुगलबंदी सिनेमात रंगलीय. अमेयने रंगवलेला नच्या तर भन्नाट झालाय. अमेयनं आतापर्यंत रंगवलेल्या भूमिकांच्या अगदी विरुध्द नचिकेत प्रधान हे पात्र आहे. या पात्रावर अमेयने घेतलेली मेहनतही दिसते. सई ताम्हणकरनेही सिनेमात तुफान बॅटिंग केलीय. कुठल्याही भूमिकेत आपण चपखल बसलीय. आलिशाच्या भूमिकेत तिनं मस्तचं गंमत आणली आहे. आलिशाचे विविध पैलू सईनं भन्नाट रंगवले आहेत. श्वेताच्या भूमिकेत रसिका सुनिल मस्तचं दिसत आहे. तिचा रोल छोटा असला तरी लक्षात राहतो. यतिन कार्येकर, कविता लाड, सुयोग गोऱ्हे, उदय नेने, ईशा केसकर, सागर देशमुख सगळ्यांनीच आपली कामं उत्तम केली आहेत.
सिनेमातील गाणी मस्तच झाली असून हृषिकेश-सौरभ-जसराज या त्रिकूटाला याचं श्रेय जातं. विशेषत: ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेण्ड’ हे गाणं भन्नाट झालंय. ‘केरिदा कोरिदो’ हे गाणंही मस्त जमून आलंय. मिलिंद जोगनेही सिनेमॅटोग्राफी अफलातून केलीये. एकूणच काय तर काही त्रुटींकडे कानाडोळा केला तर नच्याची ही गर्लफ्रेण्ड लय भारी आहे. ‘टीव्ही नाईन मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय साडे तीन स्टार्स