दोन इमारतीमध्ये वायरने गुंडाळलेला तरुणीचा मृतदेह
एका 18 वर्षीय तरुणीची हत्या करुन तिचा मृतदेह दोन इमारतींच्यामध्ये अडकवण्यात आला होता. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लखनऊ : एका 18 वर्षीय तरुणीची हत्या करुन तिचा मृतदेह दोन इमारतींच्यामध्ये अडकवण्यात आला होता. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नोएडा येथे ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे.
नोएडाच्या सेक्टर 76 येथे आम्रपाली सिलिकॉन सिटी सोसायटीमध्ये दोन उंच इमारती आहेत. या इमारतींच्यामध्ये असलेल्या एक फूट आवारात 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. सोनामुनी असं या तरुणीचे नाव आहे. आम्रपाली सिलिकॉन सिटी सोसायटीमधील रहिवाशांना उग्र वास आल्याने त्यांनी पोलिसांकडे याबाबतची तक्रार केली.
यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी तिचा मृतदेह बाहेर काढण्याच्या प्रयत्न केले, मात्र त्यांना त्यात अपयश आले. त्यामुळे त्यांनी NDRF च्या टीमला बोलवून त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी 18 व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये काम करत होती. मात्र 4 दिवसांपासून ती बेपत्ता होती. दरम्यान काल (2 जुलै) तिचा मृतदेह दोन इमारतींच्यामध्ये आढळला. त्यावेळी तिच्या मृतदेहाला पूर्णपणे केबलची वायर गुंडाळलेली होती. त्यामुळे हत्या करुन तिचा मृतदेह 18 व्या मजल्यावरुन फेकण्यात आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार तिचा मृत्यू कसा झाला. केबल तरुणीच्या गळ्यासह संपूर्ण शरीराला का बांधली होती हे स्पष्ट होईल. तसेच मृतदेहाची ओळख पटल्यानंतर या घटनेची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली आहे”, असं पोलीस अधिकारी विमल कुमार सिंह यांनी सांगितले.