सोनं कडाडलं, गेल्या पाच दिवसात दरवाढ तब्बल…
इराण आणि अमेरकित युद्धाचे ढग गडगडू लागल्यामुळे भारतात सोन्याचे भाव (Gold rate increase) गगनाला पोहोचले आहेत.
मुंबई : इराण आणि अमेरकित युद्धाचे ढग गडगडू लागल्यामुळे भारतात सोन्याचे भाव (Gold rate increase) गगनाला पोहोचले आहेत. गेल्या पाच दिवसात सोनं तब्बल 1800 रुपयांनी महागलं आहे. तर गुरुवारी (9 जानेवारी) जळगावच्या सोनेबाजारात 550 रुपयांची घट झाली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला 40 हजारांचा टप्पा सोन्याने (Gold rate increase) पार केला आहे.
युद्धाचा सर्वात मोठा फटका हा अर्थव्यवस्थेला बसतो. त्यात अमेरिकेसारखा महासत्ता देश जर युद्धाची भाषा बोलत असेल, तर जगभरातले गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मोर्चा वळवतात. त्यामुळे सोन्याच्या भावात वाढ होते.
सोन्याच्या दरासाठी मागचं वर्ष हे ऐतिहासिक ठरलं. 2019 मध्येच सोन्यानं 40 हजारांचा टप्पा गाठला. त्यामुळे दिवाळीत सोनं त्याहून पुढे जाईल, असा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र दिवाळीत सोनं 40 हजारांवरुन खाली आलं.
नव्या वर्षात सोन्याचा भाव एका तोळ्याला 38 हजार होता. मात्र अमेरिका-इराणमधल्या युद्धाच्या शक्यतेनं बुधवारी (8 जानेवारी) सोन्याचा भाव 41 हजार 400 पर्यंत पोहोचला होता. त्यामुळे येत्या काळात दोन्ही देशांमधली परिस्थिती जर निवळली नाही, तर सोन्याचे भाव 41 हजारांच्याही पुढे जाईल, असा अंदाज अनेक जाणकार व्यक्त करत आहेत.