देशाच्या इतिहासात सोनं पहिल्यांदाच 43 हजारांच्या पार, चांदीचे भावही कडाडले
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनं 43 हजार रुपयांच्या पार गेलं आहे. तसेच, चांदीच्या किंमतीतही 1000 रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबई : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनं 43 हजार रुपयांच्या पार गेलं आहे (Gold Rate Increased). दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढून प्रति10 ग्राम 43,170 रुपयांवर पोहोचला आहे. तर, बुधवारी मुंबईसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅममागे सरासरी 450 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं (Gold Rate Increased).
सोन्यासोबतच चांदीचा भावही प्रति किलोमागे 500 ते 1,000 रुपयांनी वधारला आहे. चांदीचा दर प्रतिकिलो 48,600 रुपयांपर्यंत पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रुपयाची किंमत घसरल्यामुळे आणि कोरोना विषाणूमुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं विशेषज्ञ सांगतात.
सोनं, चांदी का महागलं?
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढता दर आणि लग्नाच्या मोसमात वाढती मागणी याचा परिणाम सराफा बाजारावर झाला. तसेच, चीनमधील जीवघेण्या कोरोना विषाणूच्या (Corona Virus) धोक्यामुळे आंतराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत 1600 डॉलर प्रति औंसच्या पार गेली, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे ज्येष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी दिली.
आठवडाभरात सोनं 1500 रुपयांनी महागलं
गेल्या आठवडाभरात सोनं जवळपास 1500 रुपयांनी वधारलं आहे. तसेच, चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. लग्नसराईमुळे पुढील काही दिवसांत सोन्याची मागणी आखणी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Gold Rate Increased