Zohra Segal Google doodle | खास डुडलद्वारे गुगलची अभिनेत्री जोहरा सेहगल यांना मानवंदना!
29 सप्टेंबर 1946मध्ये जोहरा सेहगल यांचा ‘नीचा नगर’ हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात झळकला होता. इतकेच नव्हे तर, या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवातील ‘द पाल्म डी’ओर’ या मानाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले होते.
मुंबई : अभिनेत्री जोहरा सेहगल (Zohra Segal) यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. 29 सप्टेंबर 1946मध्ये जोहरा यांचा ‘नीचा नगर’ हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात झळकला होता. इतकेच नव्हे तर, या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवातील ‘द पाल्म डी’ओर’ या मानाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले होते. याच दिवसाच्या स्मरणार्थ, आज (29 सप्टेंबर) गुगलने खास डुडलद्वारे (Google Doodle) अभिनेत्री जोहरा सेहगल यांना मानवंदना दिली आहे. जोहरा सेहगल यांची नृत्य मुद्रा दाखविणारे हे डुडल पार्वती पिल्लई यांनी तयार केले आहे (Google Doodle Tribute to Zohra Segal).
नवाब घराण्यात जन्म
रामपूरच्या रोहिल्ला पठाण या नवाबी राजघराण्यात 27 एप्रिल 1912 रोजी जोहरा सेहगल यांचा जन्म झाला. साहिबजादी जोहरा मुमताजुल्ला खान बेगम हे त्यांचे संपूर्ण नाव! पाच भावंडांसह जोहरा सेहगल (Zohra Segal) यांचे बालपण उत्तराखंडमध्ये गेले. बालपणापासूनच त्या अतिशय मस्तीखोर होत्या. भावाडांसह त्या सगळ्यांच्या खोड्या काढत.
जर्मनीतून नृत्याचे शिक्षण
बालपणातच त्यांचे मातृछात्र हरपले. यानंतर त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला सुरुवात झाली. जोहरा यांनी खूप शिकावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. म्हणून जोहरा यांनी लाहोरच्या एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, तिथल्या कडक शिस्तीमुळे त्यांना नृत्याचे शिक्षण घेता येत नव्हते. हे कळताच, एडनबर्गमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मामाने जर्मनीतील ‘विगमॅन बॅले स्कूल’मध्ये त्यांना प्रवेश मिळवून दिला. जर्मनीच्या या शाळेत प्रवेश मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. जर्मनीच्या या शाळेत त्यांनी तीन वर्ष नृत्य प्रशिक्षण घेतले. याच दरम्यान त्यांना एका नृत्य नाटिकेत काम करण्याची संधी मिळाली. इथे त्यांची भेट भारताचे प्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांच्याशी झाली. त्यांनी भारतात येऊन उदय शंकर यांच्यासह काम करण्यास सुरुवात केली(Google Doodle Tribute to Zohra Segal).
1945मध्ये त्यांनी पृथ्वी थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांनी वैज्ञानिक कमलेश्वर सेहगल यांच्याशी विवाह केला. भारत-पाक फाळणीदरम्यान त्यांनी भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. जोहरा ‘इप्टा’च्या सदस्यदेखील होत्या. ‘पृथ्वी थिएटर’मधून त्यांनी अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्या उत्कृष्ट नृत्यांगनादेखील होत्या. ‘इप्टा’मुळेच चेतन आनंद यांचा ‘नीचा नगर’ हा चित्रपट जोहरा यांच्या वाट्याला आला. जोहरा यांनी राज कपूर ते रणबीर कपूर, अशा कपूर घराण्याच्या चारही पिढ्यांसोबत काम केले.
त्यांना, ‘पद्मश्री’ (1998), ‘पद्मभूषण’ (2002), ‘पद्मविभूषण’ (2010) आणि ‘संगीत नाटक अकादमी’ (1963) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 2007मध्ये प्रदर्शित झालेला ‘सावरियाँ’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 10 जुलै 2014 रोजी वयाच्या 102व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
(Google Doodle Tribute to Zohra Segal)
संबंधित बातम्या :
Google Birthday Doodle : गुगलचा 22 वा जन्मदिवस, जन्मदिनानिमित्त खास डुडल
एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल, व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर येणार