पूरग्रस्त विभागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पुण्यात दाखल
कोल्हापूर आणि सांगलीतील पुरात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पुण्यात दाखल झालं आहे. या पथकाची बैठक पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सुरु आहे.
पुणे : कोल्हापूर आणि सांगलीतील पुरात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पुण्यात दाखल झालं आहे. या पथकाची बैठक पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सुरु आहे. सात जणांचे केंद्रीय पथक पूरग्रस्त विभागाची पाहणी करणार आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉक्टर व्ही. थिरुपुगह यांच्या नेतृत्वात हे सात जणांचे पथक पुरात झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहे. तसेच पुणे विभागीय आयुक्त आणि कोकण विभागीय आयुक्तांकडून नुकसानीची माहिती घेतली जाणार आहे.
या पथकात आरोग्य, रस्ते-वाहतूक, महावितरण, पशुसंवर्धनासह इतर महत्त्वाच्या खात्यांचे अधिकारी उपस्थित असणार आहेत. त्यासोबतच राज्याचे मदत आणि पुनर्वसन खात्याचे सचिव किशोर राजे निंबाळकर हे आरोग्य, पाटबंधारे, रस्ते, पशुसंवर्धन, उद्योग, महावितरणाच्या संचालकांसोबत संवाद साधणार आहेत.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, रायगड येथील नद्यांनी आपली पूररेषा ओलांडली होती. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीमधील गावांमध्ये पाणी शिरलं होते. यावेळी हजारो लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. पुरामुळे मोठं नुकसानही प्रत्येकाचे झाले. या पूरस्थितीनंतर राज्य सरकारने केंद्राला 6 हजार 813 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे.