मुंबई : राज्यातील कोरोनाच्या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे आर्थिक घडी विस्कटली (Government Employee Salary) आहे. त्यामुळे मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दोन टप्प्यात देण्यात आला होता. पण एप्रिल महिन्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार एका टप्प्यात आणि वेळेत दिला जाणार आहे. राज्य सरकारने नुकतंच याबाबतचा आदेश काढला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार दोन टप्प्यात देण्यात (Government Employee Salary) आला होता. मात्र आता एप्रिल 2020 चे वेतन नियमित पद्धतीने एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सर्व विभागांना सूचित करण्यात येते की, त्यांना त्यांची वेतन देयके नेमून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे वेळीच कोषागरात सादर होतील हे पाहावे, जेणेकरुन कोषागारांनादेखील मर्यादित मनुष्यबळाच्या आधारे त्यावर वेळीत कार्यवाही करणे शक्य होईल, असेही यात म्हटलं आहे.
सर्व अनुदानित संस्था, विद्यापीठे, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनादेखील एप्रिलचा पगार वेळेवर देण्यास शासनाची हरकत नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
मार्च महिन्यात दोन टप्प्यात पगार
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्चच्या वेतनापोटी एप्रिलमध्ये 50 टक्के रक्कम देण्यात येईल. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना मात्र नेहमीप्रमाणे पूर्ण 100 टक्के वेतन मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती.
तसेच मंत्री, आमदार, नगरसेवकांना ४० टक्के वेतन देण्यात येणार असून ६० टक्के वेतन नंतर देण्यात येईल, असेही यापूर्वीच्या आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र एप्रिल महिन्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन देण्यात येईल याबाबतचा आदेश काढला (Government Employee Salary) आहे.