सरकारी शिक्षक निघाले बंटी आणि बबली, 9 कोटींचा गंडा, 20 वर्षे मुला मुलींना…
पती पत्नी दोघेही या शाळेत तैनात असूनही ते कधीही शाळेच्या आवारात गेले नाहीत. तब्बल 20 वर्षे त्यांनी आपल्या जागी दुसऱ्या शिक्षकांची म्हणजे डमी शिक्षक ठेवले होते. सहा महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाकडे तक्रार आली.
जयपूर : बंटी और बबली चित्रपटातील व्यक्तिरेखेसारखेच एक प्रकरण राजस्थानमध्ये उघड झाले आहे. हे दोघेही पती, पत्नी सरकारी शिक्षक आहेत. सुमारे 25 वर्षांपूर्वी शिक्षण विभागात ते शिक्षक म्हणून भरती झाले. गेल्या 20 वर्षांपासून हे पती पत्नी सरकारची फसवणूक करत असल्याचे उघड झाले. याची माहिती मिळताच शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्याचे पाऊल उचलले. त्यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. शिक्षण विभागाने त्यांच्याकडून 9 कोटी 31 लाख 50 हजार 373 रुपये वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाचे सचिव अनिल गुप्ता यांनी बरण सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विष्णू गर्ग आणि मंजू गर्ग असे या शिक्षक पती पत्नीचे नाव आहे.
विष्णू गर्ग आणि मंजू गर्ग हे राजस्थानच्या शिक्षण विभागात कार्यरत होते. विष्णू गर्ग हे बरान जिल्ह्यातील राजपुरा सरकारी शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांच्या पत्नी मंजू गर्ग याही याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मात्र, पती पत्नी दोघेही या शाळेत तैनात असूनही ते कधीही शाळेच्या आवारात गेले नाहीत. तब्बल 20 वर्षे त्यांनी आपल्या जागी दुसऱ्या शिक्षकांची म्हणजे डमी शिक्षक ठेवले होते. सहा महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाकडे तक्रार आली. विभागाने केलेल्या चौकशीअंती या दोघांच्या फसवणुकीची माहिती मिळाली.
विष्णू गर्ग आणि मंजू गर्ग यांना शिक्षण विभागाकडून महिन्याला सुमारे दीड लाख रुपये पगार मिळत होता. मात्र, या दोघांनी आपल्या जागी राजपुरा सरकारी शाळेत तीन डमी शिक्षक ठेवले होते. त्या तिघांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिले जात होते. म्हणजेच दीड लाख रुपयांच्या वेतनाऐवजी एकूण 15 हजार रुपये दरमहा पगारावर डमी शिक्षक नेमण्यात आले होते.
राजस्थान सरकारमधील शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी या प्रकरणी अशा शिक्षकांवर सरकार कठोर कारवाई करेल. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे ते म्हणाले. शिक्षण मंत्र्यांचा या विधानानंतर मुख्याध्यापक विष्णू गर्ग आणि त्यांची पत्नी मंजू गर्ग हे अटकेच्या भीतीने फरार झाले आहेत. शिक्षण विभागाने या दाम्पत्याकडून 9 कोटी 31 लाख 50373 रुपये वसूल करण्याचा निर्णय घेतला. यात मुख्याध्यापक विष्णू गर्ग यांच्याकडून 4 कोटी 92 लाख 69 हजार 146 रुपये आणि मंजू गर्ग यांच्याकडून 4 कोटी 38 लाख 81 हजार 227 रुपये वसूल करण्यात येणार आहेत. वसुलीसाठी शिक्षण खात्याचे पीईईओ गुप्ता यांनी सदर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी तीन डमी शिक्षकांना अटक केली होती. त्यावेळी केवळ वेतनवाढ रोखून हे प्रकरण मिटवण्यात आले होते. मात्र, शिक्षण मंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार शिक्षण विभागाने आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. सदर पोलीस ठाण्याचे अधिकारी लाल मीना यांनी ‘पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घोटाळ्याप्रकरणी शिक्षक दाम्पत्य विष्णू गर्ग आणि पत्नी मंजू गर्ग यांच्याविरुद्ध कलम 420 आणि 409 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’ अशी माहिती दिली.