चंद्रपूर : माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला झालेल्या अपघातात (Hansraj Ahir Convoy Car Accident) दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाले आहेत. या अपघातातून हंसराज अहिर सुखरुप वाचले आहेत.
हंसराज अहिर चंद्रपूरहून नागपूरला जात होते. त्यावेळी वर्ध्यातील जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यानंतर हा अपघात झाला. सुरक्षा वाहन ट्रकवर आदळल्यामुळे गाडीचा चेंदामेंदा (Hansraj Ahir Convoy Car Accident) झाला. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.
अपघातात विनोद झाडे आणि फळजीभाई पटेल यांचा मृत्यू झाला. विनोद झाडे हे महाराष्ट्र पोलिस विभागात कार्यरत होते, तर फळजीभाई पटेल हे सीआरपीएफचे कर्मचारी होते. नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोघांची प्राणज्योत मालवली.
अपघातात अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की, ताफ्यातील अपघातग्रस्त गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हंसराज अहिर हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून चंद्रपुरातील माजी खासदार आहेत. 1994 ते 1996 या कालावधीत अहिर महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आले होते.
अहिर चार वेळा खासदारपदी निवडून आले असून 2004 ते 2019 या काळात ते सलग तीन टर्म खासदार राहिले होते. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या बाळू धानोरकर यांनी यंदाच्या (2019) लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता.
काहीच दिवसांपूर्वी, राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नव्हती.
धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, सर्व सुखरुप
अपघातग्रस्त गाडीमध्ये धनंजय मुंडे स्वतः नव्हते, तर त्यापुढे असलेल्या दुसऱ्या गाडीमध्ये होते. मुंडे यांना अपघातात कुठलीही इजा झाली नाही, ते सुरक्षितरित्या मुंबईला पोहचले होते.