हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी
पहाटे हृदयविकाराचा धक्का आल्याने हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची प्रकृती खालावली होती. त्यानंतर सकाळी सहा वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला
वर्धा/नागपूर : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी (Hinganghat Burn Victim Teacher Death) ठरली. हृदयविकाराचा धक्का आल्याने पहाटे 24 वर्षीय पीडितेची प्रकृती खालावली होती, त्यानंतर आज सकाळी (सोमवार 10 फेब्रुवारी) सहा वाजून 55 मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीडितेवर उपचार करणारे डॉ. राजेश अटल यांनी मेडिकल बुलेटिन घेऊन तिच्या मृत्यूची दुःखद बातमी सांगितली.
पीडितेला औषधं देऊन हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. काल संपूर्ण रात्रभर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. संसर्गामुळे तिच्या रक्तपेशी, रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं होतं. त्यामुळे मेंदू, फुफ्फुसांवरही परिणाम झाला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. ‘सेप्टीसेमिक शॉक’ असं तिच्या मृत्यूचं वैद्यकीय परिभाषेतील कारण डॉक्टरांनी सांगितलं. पीडितेचं पार्थिव पोलिसांकडे सुपूर्द केलं जाणार आहे.
पीडितेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारपासूनच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेली तिची मृत्यूशी झुंज संपली.
Dr Anup Marar, Director, Orange City Hospital & Research Center, #Nagpur: The patient was declared dead at 6.55am today. The probable cause of death was Septicemic shock. Her body has been handed over to police authorities for postmortem. https://t.co/rJ1JbvppD5 pic.twitter.com/LwVaagCRpb
— ANI (@ANI) February 10, 2020
पीडितेला जाळणारा आरोपी विकी नगराळेला 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. घटनेनंतर नागरिकांमधील संताप लक्षात घेत न्यायालयाने शुक्रवारी रात्री 12.25 वाजता या प्रकरणावर सुनावणी घेतली होती. त्यानंतर आरोपीला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
[svt-event title=”हिंगणघाट जळीतकांड पीडितेचा मृत्यू, मेडिकल बुलेटिन” date=”10/02/2020,8:30AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]
काय आहे हिंगणघाट जळीतकांड प्रकरण?
24 वर्षीय शिक्षिका दररोज सकाळी कामावर जाताना आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे तिचा पाठलाग करायचा. सोमवार 3 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली होती. तिचा चेहरा जळाल्यामुळे तिच्यावर अनेक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या.
पोलिसांनी आरोपीकडून घटनेत वापरण्यात आलेलं साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. यात त्याचा मोबाईल, लायटर, कपडे, दुचाकी, शूज आणि पेट्रोलची छोटी बॉटल याचा समावेश आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याला जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नेत तपास केला.
उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी म्हणून खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी लढवावा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा : हिंगणघाटच्या हैवानासाठी रात्री 12.25 ला कोर्ट उघडलं, दहा मिनिटातील सुनावणीत काय घडलं?
संताप आणणाऱ्या या घटनेनंतर वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपीचं वकीलपत्र न भरण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर न्यायालयाने नियमानुसार विधी सेवा प्राधिकारणामार्फत आरोपीला वकील दिला. त्या वकिलानेही आपलं वकीलपत्र परत घेतल्याने आरोपीकडून कोणताही वकील उभा नव्हता. त्यामुळे कोर्टात आरोपीची बाजू मांडली गेली नव्हती.
मुख्यमंत्र्यांचे आदेश
पीडित तरुणीच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून उचलला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. तसंच या प्रकरणी दोषीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास महिला उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली.
पीडितेला न्याय देण्यासाठी ‘हिंगणघाट बंद’ची हाक
पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी हिंगणघाट शहरातील मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. हिंगणघाटच्या हैवानाचा एन्काऊण्टर करा, अशी मागणी सामान्यांकडून झाली होती. लहान मुली, शालेय विद्यार्थिनींपासून महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकही ‘हिंगणघाट बंद’मध्ये सहभागी झाले होते.
Hinganghat Burn Victim Teacher Death