UPSC : हिंगोलीतील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाला यूपीएससीत मोठं यश, देशात 574 वा क्रमांक
हिंगोलीत एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) मोठं यश मिळवलं (Hingoli Farmer boy Pass in UPSC) आहे.
हिंगोली : हिंगोलीत एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) मोठं यश मिळवलं (Hingoli Farmer boy Pass in UPSC) आहे. सुरेश शिंदे असं यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुरेशने यूपीएससीत उत्तीर्ण होत देशात 574 वा क्रमांक मिळवला आहे. सुरेशचे वडील भाजीपाला विक्री करतात. सुरेशने यूपीएससी परीक्षेत बाजी मारत आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार केलं आहे (Hingoli Farmer boy Pass in UPSC).
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी कैलास शिंदे हे शेती काम करतात. त्यांची जेमतेम अडीच एकर शेती आहे. ते गेल्या 20 वर्षापासून गावापासून 6 किमी दूर असलेल्या आपल्या शेतातच मातीच्या घरात राहतात. शेती करत भाजीपाल्याची विक्री करून आपल्या कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करत आहेत, अशा परिस्थिती ही त्यांनी आपल्या मुलाला शिकवून अधिकारी बनवण्याच स्वप्न साकार केलं आहे.
सुरेशचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच रोकडेश्वर विद्यालयात पूर्ण झालं आहे. त्यानंतर त्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी नांदेड गाठलं. याच काळात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्याने तयारीही सुरू केली. या दरम्यान 2012 मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयातून 82 टक्के गुण मिळवले. त्यानंतर 2015 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी ही मिळवली आणि आयटी सेक्टरमध्ये लठ्ठ पगाराच्या नोकरीची ऑफर त्याला आली. मात्र अधिकारी होण्यासाठी त्याने लठ्ठ पगाराची नोकरी धुडकावत आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र एक करत अभ्यास सुरू केला.
प्रथम त्याने 2017 मध्ये आणि त्यानंतर 2018 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. मात्र दोन्ही वेळेस यशाने त्याला हुलकावणी दिली. परंतु त्यांने परत नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली आणि तिसऱ्या प्रयत्नात यश त्यांच्या पदरी पडलं असून सुरेशने यूपीएससीत देशात 574 वा क्रमांक पटकावला आहे. निकाल जाहीर होताच सुरेशने गावी शेतात राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांना परीक्षा पास झाल्याची माहिती दिल्यानंतर मात्र त्याच्या आई-वडिलांना आनंद झाला आहे.
ग्रामीण भागात शिक्षण घेतल्यानंतरही अभ्यासात सातत्य, जिद्द आणि चिकाटी असेल तर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतात हे सुरेशने दाखवून दिलं आहे. सध्या गावातून आणि जिल्ह्यातून सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
संबंधित बातम्या :
बारावीला गणित विषयात नापास, यूपीएससीत देशात 261 वी रँक
लढाई-पढाई आणि निवडही एकत्रच, पुण्यातल्या रुममेटची यूपीएससीत बाजी