नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा एकदा ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले आहे. श्वासोच्छवास करण्यास त्रास होत असल्याने शाह यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाह यांची प्रकृती स्थिर आहे. (Home minister Amit Shah re-admitted to AIIMS)
शाह यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी (12 सप्टेंबर) रात्री 11 वाजता अमित शाह यांना ‘एम्स’मध्ये दाखल केले. गेल्या दीड महिन्यात त्यांना तिसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे.
दोन आठवड्यात दुसऱ्यांदा ‘एम्स’मध्ये अॅडमिट
थकवा आणि अंगदुखी ही पोस्ट कोव्हिड लक्षणे दिसल्याने अमित शाहांना 18 ऑगस्टला ‘एम्स’मध्ये अॅडमिट करण्यात आले होते. जवळपास दोन आठवड्यांच्या उपचारानंतर शाह यांना 31 ऑगस्टला घरी सोडण्यात आले.
त्याआधी, अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 2 ऑगस्ट रोजी समोर आली. अमित शाह यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात आले. जवळपास दहा ते बारा दिवसांच्या उपचारानंतर शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमित शाह यांनी 14 ऑगस्टला स्वत: ट्विटरवर माहिती देत कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले.
(Home minister Amit Shah re-admitted to AIIMS)