कोल्हापूरमध्ये अतिक्रमण काढल्याच्या रागातून पोलीस निरीक्षकाचं घर पेटवलं
अतिक्रमण काढल्याच्या रागातून थेट पोलीस निरीक्षकाच्या घरालाच आग लावल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये घडला आहे.

कोल्हापूर : अतिक्रमण काढल्याच्या रागातून थेट पोलीस निरीक्षकाच्या घरालाच आग लावल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये घडला आहे (Home of Police officer set on fire in Kolhapur). संजय पतंगे असं पीडित पोलीस निरीक्षकांचं नाव आहे. ते भुदरगड पोलीस ठाण्यात रुजू आहेत. या आगीत पतंगे यांचं घर आणि गाडीचं मोठं नुकसान झालं. या प्रकाराने भुदरगड तालुक्यात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर गारगोटीत मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला असून संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली.
भुदरगड पोलीस निवासस्थान हद्दीत आरोपी सुभाष देसाईने अतिक्रमण करून दुकान गाळा काढला होता. ते अतिक्रमण पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी हटवलं. त्याचा राग मनात ठेवून आरोपी सुभाष देसाईनं पतंगे यांना धडा शिकवण्याची धमकी दिली. यानंतर त्याने मंगळवारी (11 फेब्रुवारी) मध्यरात्री पतंगे यांच्या निवासस्थानाला आणि गाडीला रॉकेल ओतून आग लावली. हे लक्षात येताच पोलीस निरीक्षक पतंगे बाहेर आले. त्यांनी आरोपी सुभाष देसाईला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
या आगीत पतंगे यांची गाडी पूर्णत: जळाली असून फक्त सांगाडा शिल्लक राहिला. घराच्या हॉलच्या काचा फटून आगीचे लोट आत गेल्याने संपूर्ण हॉलमधील साहित्यालाही आगीच्या झळा लागल्या. यात मोठं नुकसान झालं. ही घटना घडण्यापूर्वी काही मिनिटे आधीच उपविभागीय अधिकारी अंगद जाधव या भागात गस्त घालून परत गेले होते. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपविभागीय अधिकारी अंगद जाधव, स्थानिक गुन्हा अन्वेषण निरीक्षक तानाजी सावंत, निरीक्षक उदय डुबल यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा गारगोटीत दाखल झाला.
आरोपी सुभाष देसाई महागाव (ता. गडहिंग्लज) येथे बहिणीच्या घरात लपून बसला होता. त्याला सकाळी दहाच्या सुमारास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती श्रीनिवास घाडगे यांनी दिली. सुभाष देसाई हा खुनशी आणि गुंड प्रवृत्तीचा आरोपी आहे. त्याच्याविरोधात नागरिकातून यापूर्वी तक्रारी होत होत्या. पोलिसांकडे या तक्रारी आल्या, तर आम्ही त्यावर कारवाई करू. तसेच पीडितांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी केलं आहे.
Home of Police officer set on fire in Kolhapur