रायपूर : एखाद्या परीक्षेत पतीने पहिलं आणि पत्नीने दुसरं स्थान मिळवल्याचं एखादं दुर्मिळच उदाहरण असेल. छत्तीसगड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (CGPSC) सीएमओ पदासाठी पती आणि पत्नीने मेरिट लिस्टमध्ये पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवलाय. या निवडीचा आनंद शब्दात सांगितला जाऊ शकत नाही. आम्ही एकमेकांना मदत केली आणि यश मिळवलं, अशी प्रतिक्रिया या जोडप्याने एएनआयला दिली.
पतीचं नाव अनुभव सिंह आणि पत्नीचं नाव विभा सिंह आहे. दोघेही रायपूरचे आहेत. CGPSC ने मुख्य नगरपालिका अधिकारी ग्रेड ए आणि बी श्रेणीत 36 जागांसाठी जाहिरात काढली होती. यासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत झाली. 10 जुलैला CGPSC च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.
लेखी परीक्षेत अनुभव यांना 300 पैकी 278 आणि विभा यांना 268 गुण मिळाले. तर मुलाखतीत अनुभवला 30 पैकी 20 आणि विभाला 15 गुण मिळाले. इंजिनीअरिंगचे विद्यार्थी असलेले अनुभव सिंह यांनी 2008 पासून आतापर्यंत विविध 20 परीक्षा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या काळात त्यांची चार वेळा निवडही झाली. पण त्यांनी सरकारी नोकरी सोडली. त्यांची पत्नीही सध्या सरकारी नोकरी करत आहे.
अनुभव आणि विभा यांनी एकमेकांना प्रेरणा दिली. अभ्यासासाठी नोकरीही सोडली. बायको नोकरी करते आणि पती घरात बसतो, असंही लोक म्हणायचे. पण या जोडप्याने लोकांकडे दुर्लक्ष करत अभ्यास सुरुच ठेवला.
अनुभव नोकरी सोडून परीक्षेची तयारी करत होते, तर त्यांची पत्नी विभा नोकरीसोबतच अभ्यासही करत होत्या. विभा पहाटे 5 वाजता उठायच्या आणि 7 वाजता ऑफिसला जायच्या. पतीने केलेल्या नोट्स विभा यांनाही उपयोगी आल्या. विभा ऑफिसहून आल्यानंतर पती आणि पत्नी मिळून दोघे एकत्र अभ्यास करायचे.