15 वर्षांपासून रेल्वेत पाकिटमारी करुन कोट्यधीश, ‘थानेदार’ची संपत्ती…
कुशवा याने 2004 पासून ते आतापर्यंत 400 पेक्षा जास्त चोऱ्या केल्या आहेत, यामध्ये त्याने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्तचे दागिने आणि रोकड चोरली असल्याची शक्यता आहे,
हैद्राबाद : रेल्वेत लोकांचे पाकिट मारुन एशोआरामाचं जीवन जगत असलेल्या एका चोरट्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली (Railway Police Arrested Pickpocket). या चोरट्याचं नाव थानेदार सिंह कुशवा असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशवा याने आतापर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये लोकांचे पाकिट मारुन खूप पैसा लुटला आहे आणि तो गेल्या 15 वर्षांपासून हे करत आहे. कुशवा हा हैद्राबादच्या एका लक्झरी अपार्टमेंटमध्ये राहतो. या अपार्टमेंटचं भाडं 30 हजार रुपये आहे. त्याला दोन मुलं आहेत, ही दोन्ही मुलं महागड्या इंटरनॅशनल शाळेत शिकत आहेत (Pickpocket Living Luxurious Life).
कुशवावर 2004 पासून गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशवाने पुण्याच्या येरवडा तुरुंगातही काही काळ शिक्षा भोगली आहे. याच तुरुंगात 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं.
कुशवा याने 2004 पासून ते आतापर्यंत 400 पेक्षा जास्त चोऱ्या केल्या आहेत, यामध्ये त्याने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे दागिने आणि रोकड चोरली असल्याची शक्यता आहे, अशी माहिती जीआरपी अधिक्षक बी. अनुराधा यांनी दिली. कुशवा हा क्रिकेटवर सट्टाही लावायचा, असंही पोलिसांच्या तपासात पुढे आलं.
कुशवा लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये तिकिट काढून रिझर्व्हेशनच्या डब्ब्यात चढायचा. कधी कधी तो जनरल डब्ब्यातही जायचा. त्यानंतर तो गाडीमध्ये मोठ्या चलाखीने लोकांची पाकिटं मारायचा. पोलिसांनी कुशवा याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून तब्बल 13 लाखांची रोकड आणि 54 लाख रुपये किमतीचे 67 तोळे सोनं जप्त केलं.