अजून 1 रुपया मिळाला नाही, दिल्लीत जाऊन घेणार : हरिश साळवे
भारतासाठी हा सर्वात मोठा खटला लढवण्याची जबाबदारी दिग्गज वकील हरिश साळवे यांच्याकडे होती. हा आपला मोठा विजय असल्याचं सांगत हरिश साळवे यांनी आयसीजेच्या निर्णयाचं स्वागत केलंय आणि पाकिस्तानकडून निष्पक्ष पद्धतीने न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
लंडन : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) भारताच्या बाजूने निकाल दिला. न्यायमूर्तींनी 15 विरुद्ध 1 अशा मताने निर्णय दिला. यातील केवळ एका न्यायमूर्तींनी विरोधात मतं दिलं. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचं आयसीजेने स्पष्ट केलं. भारतासाठी हा सर्वात मोठा खटला लढवण्याची जबाबदारी दिग्गज वकील हरिश साळवे यांच्याकडे होती. हा आपला मोठा विजय असल्याचं सांगत हरिश साळवे यांनी आयसीजेच्या निर्णयाचं स्वागत केलंय आणि पाकिस्तानकडून निष्पक्ष पद्धतीने न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
देशातील सर्वात महागडे वकील म्हणून प्रसिद्ध असणारे हरिश साळवे यांनी या खटल्यासाठी फक्त एक रुपया घेतला होता. या खटल्यासाठी फक्त एक रुपया का घेतला याचं कारणही त्यांनी लंडनमध्ये ‘बीबीसी’शी बोलताना सांगितलं. काही कामं तत्वांसाठी करावी लागतात, पैसे तर अनेक मिळतात, असं ते म्हणाले. शिवाय यासाठी मिळणारा एक रुपया अजून मिळाला नाही, दिल्लीत गेल्यावर घेईन, सुषमा स्वराज यांच्यासोबतही बोलणं झालंय, असंही उत्तर त्यांनी दिलं.
पाकिस्तानच्या वकिलावर 20 कोटी रुपये खर्च
कुलभूषण प्रकरणात पाकिस्तानने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयात 2 वकील बदलले. मात्र, भारताचे वकील साळवे या दोघांवरही वरचढ ठरले. विशेष म्हणजे हरिश साळवे यांनी हा खटला लढण्यासाठी आपली फी (शुल्क) म्हणून केवळ 1 रुपया घेतला आहे. दुसरीकडे कुलभूषण यांची शिक्षा कायम रहावी यासाठी पाकिस्तानने आटोकाट प्रयत्न केले. पाकिस्तानने आपल्या वकिलावरच तब्बल 20 कोटी रुपये खर्च केले.
तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी 15 मे 2017 रोजी एक ट्वीट करत साळवे यांनी कुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यासाठी केवळ 1 रुपये मानधन घेतल्याचं सांगितलं होतं. दुसरीकडे पाकिस्तान सरकारने मागील वर्षी त्यांच्या संसदेत (नॅशनल असेंब्ली) अर्थसंकल्पीय कागदपत्रं सादर केली होती. त्यात त्यांनी पाकिस्तानकडून हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांचं प्रकरण लढणारे वकील खावर कुरैशी यांना 20 कोटी रुपये दिल्याचं सांगितलं.
कोण आहेत हरिश साळवे?
साळवे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आहेत. ते देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक आहेत. त्यांची एका दिवसाची फी जवळजवळ 30 लाख रुपये असल्याचेही सांगितले जाते. मात्र, कुलभूषण प्रकरणात त्यांनी केवळ 1 रुपया घेतला. ते 1999 से 2002 पर्यंत देशाचे सॉलिसिटर जनरल देखील होते. त्यांचे वडील एन. के. पी. साळवे काँग्रेसचे माजी खासदार आणि क्रिकेट प्रशासकीय मंडळावर होते. हरिश साळवे यांनी भारताच्यावतीने नेदरलँडमधील हेग येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) बाजू मांडली. यावेळी त्यांनी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उघडपणे उल्लंघन केल्याचा मुद्दा जोरकसपणे मांडला.