विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पुढील 3 दिवस विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडले, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
नागपूर: ऐन पावसाळ्यातही पावसाने गैरहजेरी लावल्याने अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. विशेषतः विदर्भाला याचा मोठा फटका बसला आहे. मात्र, पुढील 3 दिवस विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडले, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पावसाने उघडीप दिली असली तरी 19 जुलै ते 21 जुलै दरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असं सांगण्यात आलं आहे. सध्या विदर्भात बऱ्याच भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या आकडेवारीने देशभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती. या आकडेवारीनुसार साधारण निम्म्या देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे समोर आले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे देशातील तब्बल 350 जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडला आहे. यामुळे आता निम्मा देश दुष्काळाच्या उंबरठ्यावर तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात होती.
देशात मान्सून दाखल होऊन महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला. तरीही महाराष्ट्रासह देशात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. यंदाच्या पावसाळ्यात देशातील 350 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. या कमी पावसामुळे बऱ्याच भागात अवघा खरीप हंगामच संकटात आला आहे. त्याचा शेतीच्या उत्पन्नावरही परिणाम होणार आहे. कमी पावसाचं सर्वात मोठं संकट देशातील शेतकऱ्यांसमोर आहे. कारण हा कमी पडलेला पाऊस शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावून घेतोय. अशात दुष्काळातून सुटका होत नसल्याचे पाहून विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्याही घटना घडत आहेत.
हवामान विभागाचे देशभरात 36 विभाग आहेत, यंदाच्या पावसाळ्यात या 36 विभागांपैकी अवघ्या दोनच विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. यंदा हवामान विभागाच्या तब्बल 34 विभागात पावसाची तूट आहे.
1 जून ते 15 जुलैपर्यंत देशातील 44 टक्के भागात सरासरीच्या 19 टक्के पावसाची तूट आहे. भारतीय हवामान विभागाची ही आकडेवारी नक्कीच चिंता वाढवणारी आहे. म्हणजे निम्म्या देशात पावसाची तूट ही दुष्काळाची चाहूल तर नाही ना? अशी भीतीही आता व्यक्त केली जात आहे.