पुढील 5 दिवसात राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा वेग मंदावला आहे. मात्र, हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यात काही ठिकाणी कमी-अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा वेग मंदावला आहे. मात्र, हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यात काही ठिकाणी कमी-अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातही तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत 31 ऑगस्टला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पुढील 5 दिवसांमध्ये मुंबईत अतिवृष्टीचा कोणताही इशारा नाही. पुण्यात ढगाळ वातावरण असून 29 आणि 31 ऑगस्टला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
कोकण गोव्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. येथे 28 ते 30 ऑगस्टच्या काळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या दरम्यान, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस होईल. रायगड आणि रत्नागिरीला मात्र 29 ऑगस्टला जोरदार पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रात धुळे आणि जळगाव येथे मंगळवारी (27 ऑगस्ट) जोरदार पावसाची शक्यता आहे. सातारा आणि कोल्हापुरात घाट माथ्यावर 27 आणि 28 ऑगस्टला जोरदार पावसाचा अंदाज आहे. याचवेळी नंदुरबारला देखील जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
विदर्भातही हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर अशा काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 29 ते 31 ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी जोरदार पाऊसही पडेल. मराठवाड्यात काही ठिकाणी पुढील पाच दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.