सांगलीचा पूर हटवण्यासाठी अलमट्टीचा विसर्ग वाढवा, मुख्यमंत्र्यांचा येडियुरप्पांना फोन
राज्यातील पूरस्थितीचा (Flood) आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis ) उद्या म्हणजेच बुधवारी 7 ऑगस्टला आढावा बैठक घेणार आहेत.
दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ : राज्यातील पूरस्थितीचा (Flood) आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis ) उद्या म्हणजेच बुधवारी 7 ऑगस्टला आढावा बैठक घेणार आहेत. तातडीच्या, आपत्कालिन उपाययोजना या केल्या पाहिजेतच पण दीर्घाकालीन काय उपाय करता येतील, यावर उद्या चर्चा करु, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
“कालही मी दिवसभर पूरग्रस्त भागातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. मी स्वत: केंद्र सरकारच्या विभागांशी बोललो आहे. गृहमंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारने आवश्यक ती सर्व मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्वप्रकारच्या यंत्रणा कामाला लावल्या जातील. ज्यांचं नुकसान होईल, त्यांना शक्य ती मदत दिली जाईल”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड या परिसरात पुराचा फटका बसला आहे. कोल्हापूरमध्ये NDRF च्या 2 टीम तैनात आहेत. लष्कराचे 80 जवान लोकांना सुरक्षित स्थळी नेत आहेत. 1500 कुटुंबाना बाहेर काढले आहे. सांगलीत 1 टीम पोहोचली आहे. आणखी एका टीमसाठी प्रयत्न आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तिथे आहेत. इतर मत्र्यांनाही सूचना केलेल्या आहेत”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
याशिवाय कोल्हापूर आणि सांगलीला कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरचा फटका बसतो. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनीही कोयना धरणातील विसर्ग कमी करण्याबाबत पत्र लिहलं आहे. आम्ही समन्वय साधत आहोत. त्यामुळे सांगलीतील पूरग्रस्त भागाला दिलासा मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कोल्हापूर-सांगलीत भीषण पूरस्थिती
कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीचे (Panchaganga River) पाणी घुसलं आहे. इतकंच नाही तर नदीचं पाणी पुणे-बंगळुरु महामार्गावर आल्याने, दोन्ही बाजूची वाहतूक रखडली. दुसरीकडे सांगलीत सततच्या पावसामुळे कृष्णा नदीला महापूर आला आहे. आज सकाळी 6 वाजेपर्यंत कृष्णा नदीची पाणीपातळी 49 फुटांपर्यंत पोहोचली आहे. तसेच यामुळे वारणा आणि कृष्णा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान या भीषण पूरपरिस्थितीमुळे मदतीसाठी NDRF ची टीम दाखल होणार आहे.
संबंधित बातम्या
Kolhapur Rain | कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार, आधीच महापूर, त्यात राधानगरीचे दरवाजे उघडले