लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास दहापट दंड, एक सप्टेंबरपासून वाहतुकीचे 17 नियम अधिक कडक
ड्रायव्हिंग लायसन्स सोबत नसेल तर पाचशे रुपयांऐवजी दसपट म्हणजे तब्बल पाच हजार रुपये दंड मोजावा लागणार आहे. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला जात होता, तोही आता दहा हजार रुपयांवर नेण्यात आला आहे.
मुंबई : मोटार वाहन कायद्यातील (Motor Vehicle Act) बदलांनंतर येत्या एक सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत. वाहतुकीचे नवीन नियम आधीपेक्षा अधिक कठोर असतील. वाहतूक परवान्याशिवाय गाडी चालवल्यास दंड दहापट करण्यात आला आहे.
मोटार वाहन कायदा नियमात आणि त्यांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत.
ड्रायव्हिंग लायसन्स सोबत नसेल तर पाचशे रुपयांऐवजी दसपट म्हणजे तब्बल पाच हजार रुपये दंड मोजावा लागणार आहे. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला जात होता, तोही आता दहा हजार रुपयांवर नेण्यात आला आहे.
वाहतुकीचे नवे नियम लागू करण्याबाबत विधेयकाला संसदेने मंजुरी दिली. अल्पवयीन मुलांनी गाडी चालवताना अपघात घडला, तर त्याच्या किंवा तिच्या पालकांना तीन वर्ष तुरुंगवासाची तरतूद आहे. त्याचबरोबर त्या वाहनाची नोंदणीही रद्द करण्यात येईल.
रुग्णवाहिका, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता दिला नाही, किंवा पात्र नसतानाही गाडी चालवली, तर दहा हजार रुपये दंड होऊ शकतो. भरधाव वेगाने गाडी चालवल्यास एक ते दोन हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
नव्या नियमांवर एक नजर
1. विनातिकीट प्रवास केल्यास पाचशे रुपये दंड
2. अधिकाऱ्यांचा आदेश न मानल्यास दोन हजार रुपये दंड
3. ड्रायव्हिंग लायसन्स नसताना गाडी चालवल्यास पाच हजार रुपये दंड
4. अपात्र असताना वाहन चालवल्यास दहा हजार रुपये दंड
5. भरधाव वेगाने गाडी चालवल्यास एक हजार रुपये दंड
6. धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास पाच हजार रुपये दंड
7. दारु पिऊन गाडी चालवल्यास दहा हजार रुपये दंड
8. ओव्हरस्पीड किंवा रेसिंग केल्यास पाच हजार रुपये दंड
9. वाहन परवान्याचे नियम तोडल्यास 25 हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद
10. वाहनात अतिरिक्त सामान भरल्यास दोन हजार रुपयांहून जास्त दंड
11. वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास प्रत्येकामागे एक हजार रुपये दंड
12. सीटबेल्ट न लावल्यास एक हजार रुपये दंड
13. स्कूटर किंवा बाईकवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती बसल्यास दोन हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द
14. हेल्मेट न घातल्यास एक हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द
15. अँब्युलन्स, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास दहा हजार रुपये दंड
16. इन्शुरन्स नसलेलं वाहन चालवल्यास दोन हजार रुपये दंड
17. अल्पवयीन पाल्याने गाडी चालवताना अपघात झाल्यास पालकांना तीन वर्ष तुरुंगवास आणि वाहनाची नोंदणीही रद्द