पाकिस्तान बेपत्ता पायलटच्या केसालाही धक्का लावू शकत नाही
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या वायूसेनेत जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर संघर्ष पाहायला मिळाला. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने बदला घ्यायचा म्हणून भारतीय सीमेत घुसून बॉम्बने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पाकिस्तानने भारतीय विमान पाडल्याचं बोललं जातंय. शिवाय दोन पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावाही पाकिस्तानने केलाय. विशेष म्हणजे आमचा एक पायलट बेपत्ता असल्याची कबुली भारतीय […]
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या वायूसेनेत जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर संघर्ष पाहायला मिळाला. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने बदला घ्यायचा म्हणून भारतीय सीमेत घुसून बॉम्बने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पाकिस्तानने भारतीय विमान पाडल्याचं बोललं जातंय. शिवाय दोन पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावाही पाकिस्तानने केलाय. विशेष म्हणजे आमचा एक पायलट बेपत्ता असल्याची कबुली भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान असं या पायलटचं नाव आहे. देशातील प्रत्येकाला अभिनंदन यांची चिंता वाटत आहे. पाकिस्तानकडून आणखी एक व्हिडीओ जारी करण्यात आलाय, ज्यात अभिनंदन हे चहा पित आहेत. शिवाय मी सुखरुप असून पाकिस्तानी लष्कर माझी काळजी घेत आहे, असं ते या व्हिडीओमध्ये बोलत आहेत.
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नियम पाळत असेल तर अभिनंदन यांच्या केसालाही धक्का लावता येणार नाही. कारण, युद्धबंदींसाठी खास करार आहे. जिनेव्हा करार असं याचं नाव आहे. या करारानुसार युद्धबंदींना भीती दाखवली जाऊ शकत नाही, किंवा त्यांचा अपमानही केला जाऊ शकत नाही. युद्धबंदींचा वापर करुन जनतेमध्ये उत्सुकता करण्यासाठीही बंदी आहे.
जिनेव्हा करारानुसार, एकतर युद्धबंदीवर खटला चालवला जाऊ शकतो, किंवा संबंधित देशाकडे त्या युद्धबंदीचं हस्तांतरण करावं लागेल. युद्धबंदी पकडल्यानंतर नाव, सैन्यातील पद आणि नंबर सांगण्याची तरतूद आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराला अभिनंदन यांना एका सैनिकासारखीच वागणूक द्यावी लागेल.
दरम्यान, जिनेव्हा कराराचं उल्लंघन अनेक देशांनी केलेलं आहे. मानवी मूल्य जोपासण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात आला होता.
पाकिस्तानचा यू टर्न
पाकिस्तानकडून सकाळपासून ओरडून सांगितलं जातंय की आम्ही भारताच्या दोन पायलटला ताब्यात घेतलंय. एका पायलटवर उपचार सुरु असल्याचंही सांगितलं गेलं. पण आमच्याकडे एकच पायलट असल्याचं पाकिस्तानच्या लष्कराने म्हटलंय. विशेष म्हणजे पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खाननेही आमच्याकडे दोन पायलट असल्याचं म्हटलं होतं.