नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात 17 जुलै रोजी निकाल दिला जाणार आहे. यापूर्वी भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूंकडून आपला युक्तीवाद पूर्ण करण्यात आलाय. यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. 17 जुलैला हेगमधील पीस पॅलेसमध्ये दुपारी 3 वाजता आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या पॅनलचे अध्यक्ष अब्दुलकवी अहमद युसूफ हे निर्णय सुनावतील.
पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने सुनावलेल्या या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा नकार दिल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे 18 मे 2017 रोजी कोर्टाने फाशीला स्थगिती दिली होती.
फेब्रुवारीमध्ये चार दिवस दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेण्यात आला होता. भारताने प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं. व्हिएन्ना कराराचं उल्लंघन आणि consular access नाकारल्याचा मुद्दा भारताने पुढे केला. याशिवाय कुलभूषण जाधव यांना तातडीने सोडण्यात यावं, अशी मागणीही भारताने केली होती.
दरम्यान, कुलभूषण जाधव हे हेरगिरी करत असल्याचा युक्तीवाद पाकिस्तानकडून करण्यात आला होता. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर कुलभूषण जाधव व्यवसाय करत होते, पण त्यांचं इराणमधून अपहरण करण्यात आल्याचं भारताने सांगितलं. भारताने अनेकदा consular access मागूनही पाकिस्तानने सतत नकार दिला होता. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून पाकिस्तानशी अनेकदा संपर्क साधला होता.
कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आई या दोघींना भेटण्याची मुभा देण्यात आली होती. 25 डिसेंबर 2017 रोजी दोघीही कुलभूषण जाधव यांना भेटून आल्या होत्या. मात्र एवढ्या वर्षांनी भेटून कुलभूषण यांच्या जवळही जाता आलं नव्हतं. दोघांच्या मध्ये काच लावलेली होती आणि फोनद्वारे संभाषण करायला लावलं, ज्यामुळे जवळून भेटही होऊ शकली नाही.