मुंबई– नव्वदीच्या दशकात देशातील मुलाबाळांतही शिवसेना (Shivsena)परिचित होती. त्यावेळी हिंदुत्व ही शिवसेनेची ओळख होती. दाढी वाढलेला, भगवा टिळा लावलेला आणि शिवसेनेचा उपरणे गळ्यात टाकून गावात, शहरात आंदोलनाला कधीही सज्ज असलेला तरुण, हा शिवसेनेचा शिवसैनिक सगळीकडे दिसत होता. हातात भगवा, पक्षाचं चिन्ह वाघ. गर्व से कहो हम हिंदू है, हा नारा शिवसेनेने महाराष्ट्रात (Maharashtra)बुलंद केला. अनेकांसाठी शिवसेना हा अभिमानाचा विषय होता, कितीतरी जणांसाठी धर्मयुद्धाची सेना होती तर काही जणांसाठी तिच्या ठोकशाहीची दहशत होती. त्यामुळेच १९९२ साली बाबरी ढाचा पाडण्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलासोबत शिवसेनेलाही श्रेय दिले गेले. एका प्रादेशिक आणि मराठी माणसांसाठी लढणाऱ्या पक्षाला, उ. भारतातील रामजन्मभूमीच्या आंदोलनात (Ram janmbhoomi) पहिल्या मानाच्या पानावर स्थान मिळालं, ही शिवसेनेसाठी मोठी उपलब्धी होती.
मुंबईत कधी दंगली झाल्या, सिनेमांना विरोध झाला, माफियांशी संघर्ष झाला तरी सगळेजण शिवसेनेच्या दरबारात ते सोडवित असत. ९० च्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आवाज दिला, तर मुंबई बंद होत असे. एक कपा चहा मिळणंही अवघड होईल, एवढी परिस्थिती होती. मातोश्रीवर दरबार भरत होता, त्यात निर्णय होत, भांडणे सोडवली जात, तह होत. रिमोटकंट्रोलने शहर आणि राजकारण चालत असे. यातून युतीचे सरकार १९९५ साली सत्तेत आले. शिवसेनेला साडे चार वर्ष सत्तेत थेट सहभागी होण्याची संधी मिळाली.
पुढे पुढे काळ्या चष्म्यातून येणारी भेदक नजर वयोमानाप्रमाणे थोडी कमकुवत झाली. पक्षात उत्तराधिकाऱ्याची चर्चा सुरु झाली. मुलगा की पुतण्या, असे दोन पर्याय होते. उद्धव ठाकरे तुलनेने शांत, तर राज ठाकरे आक्रमक सवभावाचे होते. त्याकाळी राज ठाकरेंनाच बाळासाहेबांचा राजकीय वारसदार मानले जात होते. त्यानंतर नारायण राणेंनी शिवसेना सोडली. राज ठाकरेंच्या जागी उद्धव यांना हे सिंहासन मिळाले. शिवसेना पक्ष त्यानंतर पुन्हा फुटला. राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या मुदद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.
त्यानंतर ही कहाणी वारसदाराच्या संघर्षावर आली. शिवसेना आणि मनसे समोरासमोर उभी ठाकली. बाळासाहेबांच्या निदनानंतर तर खुलेआम संघर्ष झाला. उत्तराधिकारी कोण आणि मराठी माणसांचा खरा वाली कोण, या मुद्द्यावर उद्धव आणि राज ठाकरे आमनेसामने आले. या सगळ्या काळात शिवसेना थोडी कमकुवत झाल्याचे दिसू लागले. राणे आणि राज ठाकरेंचे आव्हान शिवसेनेला मिळू लागले. तोपर्यंत मुंबईत शिवसेनेला डोळे दाखवायची कुणाची हिंमत नव्हती.
त्यावेळी राज ठाकरे शिवसेनेपेक्षा जास्त आक्रमक रुपात दिसले. उत्तर भारतीयांविरुद्ध आंदोलन गाजले. त्याचा आता राजकीय तोटा होत असला तरी त्यावेळी आंदोलन गाजले. मनसेच्या या आंदोलनातही, शिवसेनेची संघटनात्मक ताकद टिकून होती. शिवसेनाच मुंबईकर मराठी माणसांची पहिली पसंत राहिली.
शिवसेनेचा जनाधार चांगला होता. नरेंद्र मोदींच्या लाटेत, युती तुटलेली असतानाही शिवसेनेलाही फायदा झाला. सत्तेत पुन्हा अपरिहार्यपणे शिवसेना-भाजपा एकत्र आले. २०१७ ला झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाने शिवसेनेसमोर पहिल्यांदा आव्हान उभे केले. थोडक्यात मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेला वर्चस्व निर्माण करता आले.
बाळासाहेबांची शिवसेना बदललेली होती. आता उद्धव ठाकरेंची शिवसेना झाली होती. मध्यंतरी अनेक विजय, वादळे पचवलेली षशिवसेना नवया रुपात सज्ज झालेली होती. २०१९ च्या विधानसभा निवडमुकीत शिवसेना-भाजपा युतीत लढले खरे. मात्र ५६ जागा शिवसेनेला आणि १०६ जागा भाजपाला मिळाल्या. महत्त्वाकांक्षी शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला. महिनाभर चाललेल्या खेळानंतर शरद पवारांनी समीकरण जमवले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंकडे गेले. या काळात सातत्याने हल्ले पचवावे लागले, हेही खरे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र कोरोना, आघाडीतील घटकपक्ष आणि भाजपा यांनी उद्धव ठाकरे सरकारचा प्रत्यक दिवस संघर्षाचा केला. आरोग्याच्या मुद्द्यामुळेही उद्धव ठाकरे जनतेत कमीच मिसळू शकले. याच काळात आदित्य ठाकरे यांचे प्राबल्य मात्र लाढत चालले होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता बहुसंख्य आमदार बाहेरच्या राज्यात गेले आहेत. सरकार वाचेल की नाही ही शंका आहे. मात्र संकट केवळ सरकार वाचवायचे नाहीये. आता शिवसेनेच वर्चस्व कुणाचे हा नवा संघर्ष आहे. जुनी पिढी आणि नवी पिढी असा हा संघर्ष आहे. जे विश्वासपात्र होते, ज्यांनी संघटनेला वेळ आणि श्रम दिले, विधानसभा मजबूत केली, ते आता पक्षात बाजूला पडत असल्याची तक्रार करण्यात येते आहे.
हा शिवसेनेसारख्या पक्षासाठी प्रतिमेला धक्का आहे. जो पक्ष कधीकाळी मुंबई आणि राज्याचा रिमोट कंट्रोल होती, ती आत्ता थेट सत्तेत असून आपले आमदार सांभाळू शकत नाही, असा संदेश या बंडातून गेला आहे. या कमकुवत शिवसेनेच्या प्रतिमेला सावरणे हे उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे.
शिवसेना आक्रमक होती ती शांत झाली, तिचा स्वभाव तिने बदलला. विचारधारेशी तिने तडजोड केली. सत्तेसाठी सिद्धांताशी तडजोड केली. सत्तेसाठी असे अनेक बदल शिवसेनेने स्वभावात केले. इतके करुन तिचा मुलाधार असलेल्या जनतेपासून ती लांब चालली आहे का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. एकूणच शिवसेनेची जी दहशत होती ती कमी आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. ना लोकांमध्ये आहे, ना आमदारांमध्ये आहे. सत्ता मिळवणं हे एकमेव लक्ष्य ठेवलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वाने शिवसेनेची ही ओळखच पुसली आहे का, असा प्रश्न विचारण्यात येतो आहे. ही गेलेली ओळख ठाकरे परिवार पुन्हा मिळवण्यात यशस्वी होणार का, हा खरा प्रश्न आहे.