जयपूर : ‘कोरोना’शी दोन हात करणारे डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार आणि अत्यावश्यक सुविधा पुरवणारे कर्मचारी शब्दशः ‘देवदूत’ आहेत. नर्सिंग इंचार्ज म्हणून कार्यरत असलेल्या जयपूरच्या ‘देवदुता’ने आईच्या निधनानंतरही कर्तव्याला प्राधान्य दिलं. ‘व्हिडीओ कॉल’मधून ते आईच्या अंत्यसंस्कारांमध्ये सहभागी झाले. “आई, मी तुझ्या चितेला अग्नी देऊ शकलो नाही, याचे मला वाईट वाटते” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. (Jaipur Nursing In charge performs Mothers last rites on Video call)
जयपूरमधील सवाई मानसिंग हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्ष आणि आयसीयूतील नर्सिंग विभागाचे प्रभारी राममूर्ती मीना यांची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. कोरोनाशी झुंजणाऱ्या रुग्णांना सोडण्याऐवजी आईच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचा मार्ग राममूर्ती यांनी निवडला. जन्म देणाऱ्या माऊलीपुढे मातृभूमीचे प्रेम आणि ऋण मोठे ठरले.
राममूर्ती राजस्थानमधील करौलीतील रानोली गावचे रहिवासी. त्यांच्या 93 वर्षीय मातोश्री भोली देवी यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. बातमी ऐकताच त्यांच्या मनाची चलबिचल झाली खरी, मात्र देशाच्या या कर्मवीराने ‘ड्युटी फर्स्ट’ हे घोषवाक्य शिरोधारी मानलं. ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी आईच्या अंत्यदर्शनालाही न जाण्याचा निर्णय त्यांनी जड अंत:करणाने घेतला.
एकीकडे रुग्णांची सेवा करताना, डोळ्यातले अश्रू रोखण्याचं अवघड काम त्यांना पेलायचं होतं. लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे मोजक्या जणांनी भोली देवी यांच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला. राममूर्तींनी व्हिडिओ कॉलद्वारे आईच्या अंत्यसंस्कारात भाग घेतला. आईच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन मोबाइलवर घेताना त्यांच्या अश्रूचा बांध फुटला. (Jaipur Nursing In charge performs Mothers last rites on Video call)
सध्या राममूर्ती जयपूरमध्ये क्वारंटाइन आहेत. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ने फोनवर राममूर्ती यांना अभिवादन केले, तेव्हा ते म्हणाले, “लोकांचे प्राण वाचवणे माझे कर्तव्य आहे.” त्यांनी आईकडे मनोमन दिलगिरीही व्यक्त केली. “आई, मी तुझ्या चितेला अग्नी देऊ शकलो नाही, याचे मला वाईट वाटते” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
जयपुर SMS हॉस्पिटल में ICU नर्सिंग इंचार्ज राममूर्ति मीणा ने कोरोना से जंग लड़ रहे मरीज़ों का साथ छोड़ने के बजाय मां की अंत्येष्टि में न जाने का रास्ता चुना. लाखों सलाम इस कोरोना योद्धा की देशभक्ति, जज़्बे और बलिदान को. सब याद रखा जाएगा ????https://t.co/kUHRHRYoVJ
— Samir Abbas (@TheSamirAbbas) April 7, 2020
दरम्यान, तीन मुलं लॉकडाऊनमुळे तेलंगणात अडकल्यामुळे सोलापुरात राहणाऱ्या वृद्धेने पतीला मुखाग्नी दिल्याची घटना गेल्या आठवड्यात समोर आली होती. 75 वर्षीय व्यक्तीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. तेलंगाणामध्ये सलून सांभाळणारी त्यांची तिन्ही मुलं तिथेच अडकली. अखेर त्यांच्या 70 वर्षीय पत्नीनेच आपल्या वृद्ध पतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
सविस्तर बातमी वाचा : लॉकडाऊनमुळे तीन मुलं परराज्यात, सोलापुरात वृद्धेचा पतीला मुखाग्नी
(Jaipur Nursing In charge performs Mothers last rites on Video call)