मसूद बिथरला, ‘जैश’च्या सात आत्मघाती दहशतवाद्यांची काश्मीरमध्ये घुसखोरी
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर मसूद अझहरने भारतात मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याच्या हेतूने सात आत्मघाती दहशतवादी घुसवल्याची माहिती आहे
श्रीनगर : ‘जैश ए मोहम्मद’चे (Jaish E Mohammed) सात आत्मघाती दहशतवादी जम्मू काश्मिरमध्ये घुसल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. बकरी ईद आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘जैश’ मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत आहेत, असा सतर्कतेचा इशारा सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर गांगरलेल्या मसूद अझहर (Masood Azhar) ने भारताविरोधात मोठा कट रचल्याची माहिती आहे.
‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित झालेला मसूद अझहर बिथरला आहे. त्यामुळेच त्याने भारताविरोधात हल्लाबोल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेकडूनच जैशला हिरवा कंदिल मिळाल्याचं म्हटलं जातं.
दक्षिण बनिहाल आणि पीर पंजार पर्वतरांगेतून दहशतवाद्यांना घुसखोरी केल्याची माहिती आहे. राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात ते लपल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मसूदचा भाऊ अब्दुल रौफने हा कट रचला आहे. 1999 मध्ये IC-814 विमानाचं काठमांडूला झालेल्या अपहरणाची योजनाही त्याचीच होती.
आत्मघाती दहशतवादी काश्मीरमधील एखाद्या मशिदीवर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्ल्यासाठी भारतालाच जबाबदार धरता यावं, यासाठी पाकिस्तानने ही योजना आखल्याचं बोललं जात आहे. भारत-पाकमधील उभयपक्षी संबंध बिघडण्याची तमा न बाळगता पाकिस्तानने अधिकाधिक जीवितहानी घडवण्याचे आदेश दहशतवाद्यांना दिले आहेत, अशीही माहिती आहे.
केंद्र सरकारने कलम 370 रद्द करत जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले आहेत. या निर्णयाच्या अवघ्या आठवड्याभरातच पाकिस्तानची तणतण सुरु झाली आहे. पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानने आठ ऑगस्टलाच ट्विटरवरुन संताप व्यक्त केला होता.
The whole world is waiting to see what happens to oppressed Kashmiris in IOK when curfew is lifted. Does the BJP govt think by using greater military force against Kashmiris in IOK, it will stop the freedom movement? Chances are it will gain momentum.
— Imran Khan (@ImranKhanPTI) August 8, 2019