‘पतीच्या बलिदानाचा अभिमान!’ जम्मू-काश्मीरमध्ये शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप

| Updated on: May 05, 2020 | 4:57 PM

शहीद मेजर अनुज सूद यांच्या अंत्यसंस्कारासाठी फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या नातेवाईकांना परवानगी देण्यात आली होती (Jammu Kashmir Martyr Major Anuj Sood Mortal Remains Cremated)

पतीच्या बलिदानाचा अभिमान! जम्मू-काश्मीरमध्ये शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप
Follow us on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेले मेजर अनुज सूद अनंतात विलीन झाले. अनुजच्या बलिदानाचा मला अभिमान आहे. तो नेहमीच माझ्यासोबत राहील, अशा भावना त्यांची पत्नी आकृती सूद यांनी अखेरचा निरोप देताना व्यक्त केल्या. (Jammu Kashmir Martyr Major Anuj Sood Mortal Remains Cremated)

शहीद मेजर अनुज सूद यांच्या अंत्यसंस्कारासाठी ब्रिगेडियर पदावरुन निवृत्त झालेले त्यांचे वडील सीके सूद, वीरमाता सुमन सूद आणि वीरपत्नी आकृती सूद उपस्थित होत्या. अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली आहे. बेटा, तुला सलाम! असे उद्गार यावेळी त्यांच्या पित्याने काढले. वडिलांनी मेजर अनुज सूद यांना मुखाग्नी दिला.

हिमाचल प्रदेशातील कांग्रा येथे राहणाऱ्या आकृती यांच्याशी तीन महिन्यांपूर्वी मेजर अनुज सूद विवाहबद्ध झाले होते. आकृती सूद सध्या पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. मेजर अनुज यांच्या मातोश्री सुमन सूद या सरकारी शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. मेजर अनुज सूद यांची मोठी बहीण ऑस्ट्रेलियामध्ये राहते, तर धाकटी बहीण सैन्यात तैनात आहे.

शहीद मेजर अनुज सूद यांच्या अंत्यसंस्कारासाठी फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या नातेवाईकांना परवानगी देण्यात आली होती. या सर्वांनाही एकमेकांपासून योग्य अंतरावर बसवण्यात आले होते.

शहीद मेजर अनुज सूद यांचं पार्थिव सोमवारी चंडीमंदिर येथील कमांड रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यानंतर चंडीगडमध्ये वायुसेनेने त्यांना श्रद्धांजली वाहिली. सैन्य अधिकार्‍यांनी त्यांना पुष्पहार अर्पण केले. यानंतर सैन्य अधिकारी आणि इतर लष्करी कर्मचारी शहीद मेजर अनुज सूद यांच्या आई-वडिलांसह नातेवाईकांना घेऊन कमांड हॉस्पिटलला आले. मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव हरियाणामधील निवासस्थानी आणण्यात आले होते. (Jammu Kashmir Martyr Major Anuj Sood Mortal Remains Cremated)

अंत्यदर्शनाच्या वेळी सर्वांचे डोळे पाणावले होते. मात्र देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद मेजरला सर्वांनी अभिवादन केलं. ब्रिगेडियर पदावरुन निवृत्त झालेले त्यांचे वडील सीके सूद यांनी छाती अभिमानाने फुलून गेली होती. वीरमाता आणि वीरपत्नीनेही शहीद अनुज सूद यांच्या शौर्याला सलाम केला.

जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा येथे 3 मे रोजी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल, मेजर आणि 3 जवान शहीद झाले. शहिदांमध्ये जम्मू-काश्मीरचे पोलिस उपनिरीक्षक शकील काझी यांच्यासह 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, नाईक राकेश, लान्स नाईक दिनेश यांचा समावेश आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मृत्यूमुखी पडलेले दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे होते.