जानेवारी अखेपर्यंत परदेशी नागरिकांसाठी जपानचे दरवाजे बंद
जपानमध्ये येणाऱ्या परदरेशी नागरिकांसाठी जपानी सरकारने त्यांच्या देशाचे दरवाजे बंद केले आहेत.
टोकियो : जपानमध्ये येणाऱ्या परदरेशी नागरिकांसाठी जपानी सरकारने त्यांच्या देशाचे दरवाजे बंद केले आहेत. जपानने परदेशी नागरिकांच्या जपानमधील प्रवेशावर बंदी घातली आहे. ही बंदी 28 डिसेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत लागू असेल. शनिवारी जपानी माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले. अनेक देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तसेच यूकेसह अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन (कोरोना विषाणूची नवी प्रजाती) आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर जपानी सरकारने परदेशी नागरिकांसाठी त्यांच्या देशाचे दरवाजे बंद केले असल्याचे बोलले जात आहे. (japan bans entry for foreigners from December to January end)
जपानमध्ये शनिवारी स्थानिक वेळेनुसार 8 वाजता 3 हजार 877 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह जपानमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 19 हजार 142 इतकी झाली आहे. एनएचकेने याबाबतची माहिती दिली आहे. जपानमध्ये आतापर्यंत 3 हजार 155 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 80 हजार 188 रुग्ण बरे झाले असून जपानमध्ये सध्या 30 हजार 204 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. याबाबतची माहिती वर्ल्डोमीटर या वेबसाईटने प्रसिद्ध केली आहे.
जपानी सरकारने शनिवारी घोषणा केली आहे की, नवे निर्बंध सोमवारपासून लागू होणार आहेत. निक्केई न्यूज सर्विसने जाहीर केले आहे की, केवळ जपानी नागरिकांना आणि जपानमध्ये वास्तव्यास असणाऱ्या परदेशी नागरिकांना जपानमध्ये परतण्याची अनुमती देण्यात आली आहे. जपानी सरकारकडून सांगण्यात आले आहे की, कोरोना रोगाचा प्रसार कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोबरपासून जपानमध्ये परदेश नागरिकांना 14 दिवसांच्या क्वारंटाईन राहण्याच्या अटीवर देशात प्रवेश दिला जाऊ लागला होता.
जपानची राजधानी टोकियोमध्ये शनिवारी 949 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच जपानमध्ये दोन अशा रुग्णांची नोंद झाली आहे ज्यांच्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. दरम्यान, कोरोनाचा नवा स्ट्रेन सुरुवातीला ब्रिटनमध्ये आढळला होता. आतापर्यंत हा विषाणू दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, दक्षिण कोरिया, फ्रान्स, लेबनान, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, इटली आणि नेदरलँड या देशांमध्ये आढळला आहे.
जगभरात 8 कोटी कोरोनाबाधितांची नोंद
वर्ल्डोमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात 8 कोटी 3 लाख 14 हजार 303 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 5 कोटी 66 लाख 6 हजार 247 रुग्ण बरे झाले आहेत, तर 17 लाख 59 हजार 475 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या 2 कोटी 19 लाख 47 हजार 581 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरीकेत 1 कोटी 92 लाख 14 हजार 535 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 1 कोटी 12 लाख 60 हजार 882 रुग्ण बरे झाले आहेत, तर 3 लाख 38 हजार 294 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या नंबरवर आहे. भारतात आतापर्यंत 1 कोटी 1 लाख 72 हजार 529 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 96 लाख 42 हजार 959 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 47 हजार 415 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा
2021 मध्येही नवी संकटं येणार, जग कसं तोंड देणार? WHO कडून ‘या’ 10 उपाययोजनांचा सल्ला
अमेरिकेत ‘या’ लसीमुळे साईड इफेक्ट?, वाचा नेमकं काय घडलं?
New Strain of Coronavirus UK : कोरोनाचा नवा अवतार आशियात धडकला, पहिला रुग्ण सापडला
(japan bans entry for foreigners from December to January end)