मुंबई: महावितरणकडून उपकेंद्र सहायक या पदासाठी राबवण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेतून (Job recruitment) मराठा समाजाच्या (Maratha Community) उमेदवारांना वगळण्यात आल्याने आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी खासदार संभाजीराजे यांना मराठा तरुणांना भरती प्रक्रियेतून वगळणार नाही, असा शब्द दिला होता. मात्र, आता मराठा उमेदवारांविनाच भरती प्रक्रिया राबवण्याच्या निर्णयामुळे रोष उत्पन्न झाला आहे. (job recruitment in Mahavitaran)
मराठा तरुणांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात (SEBC) समावेश करुन दिवाळीची भेट देतो, असे आश्वासन खासदार संभाजीराजे यांना देण्यात आले होते. मात्र, महावितरणने आता मराठा तरुणांना वगळून ही भरती प्रक्रिया राबवण्याचे ठरवल्यामुळे समाजाच्या अपेक्षांवर पाणी फेरल्याची टीका मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी केली.
महावितरणने काढलेल्या परिपत्रकात SEBC मराठा विद्यार्थ्यांना वगळून इतर भरती करत असल्याचे स्पष्ट झाल्याने संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीराजे यांना फोन करुन मराठा समाजातील तरुणांना महावितरण भरती प्रक्रियेत समाविष्ट करुन घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता महावितरणने मराठा समाज आणि छत्रपती संभाजीराजे यांची सपशेल फसवणूक केल्याचे धनंजय जाधव यांनी म्हटले. याबद्दल आम्ही उर्जामंत्री नितीन राऊत यांचा धिक्कार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये. कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही धनंजय जाधव यांनी केले.
मराठा आरक्षणासाठी आता मराठा क्रांती मोर्चाकडून (Maratha Kranti Morcha) मशाल रथयात्रा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद ते मुंबईतील आझाद मैदान अशी ही रथयात्रा असेल. येत्या 28 तारखेला ही मशाल रथयात्रा औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने कूच करेल. कोपर्डी आणि शिवनेरी किल्ल्याच्या मार्गाने ही रथयात्रा मार्गक्रमण करेल, असे सांगितले जात आहे. मात्र, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका असल्याने राज्य सरकार या रथयात्रेला परवानगी नाकारण्याची शक्यता अधिक आहे.
यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावर मशाल मोर्चा काढण्याची हाक देण्यात आली होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे आता सरकार मराठा आंदोलकांचा रोष कसा हाताळणार, हे पाहावे लागेल.
संबंधित बातम्या:
वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालेन: उदयनराजे भोसले
मराठा आरक्षण समितीवरून चव्हाणांना हटवून एकनाथ शिंदेंना अध्यक्ष करा; नरेंद्र पाटील यांची मागणी
मराठा आरक्षणासाठी आता रथयात्रा निघणार; 28 नोव्हेंबरला आंदोलक मुंबईकडे कूच करणार
(job recruitment in Mahavitaran)