मोठी बातमी: कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना होणार; मुख्यमंत्री येडियुरप्पांचा मोठा निर्णय
सीमाभागातील मराठी बांधवांच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल. | Maratha Development Authority
बंगळुरु: कर्नाटकातील मराठी बांधवांसाठी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कर्नाटक सरकारकडून आता मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. या प्राधिकरणासाठी कर्नाटक राज्याच्या अर्थसंकल्पात 50 कोटीची तरतूद करण्यात येईल. त्यामुळे सीमाभागातील मराठी बांधवांच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल. या प्राधिकरणाकडून मराठी बांधवांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. (Karnataka govt will setup Maratha Development Authority announcement by cm bs yeddyurappa)
कर्नाटकच्या बसवकल्याण विधानसभा मतदारसंघासाठी लवकरच पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी ही घोषणा केल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या कर्नाटक स्थापना दिनी यावरुन वाद उफाळून आला होता. यावेळी महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील होणारच, असा निर्धार बोलून दाखवला होता. यानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असल्याचे वक्तव्य केले होते. जोपर्यंत सूर्य, चंद्र असले तोपर्यंत बेळगाव महाराष्ट्राला मिळणार नाही, अशी चिथावणीखोर भाषा त्यांनी केली होती.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. चंद्र-सूर्य कशाला, तुमच्या उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल, अशी चपराक मुश्रीफ यांनी लगावली होती.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा सीमाभागातील जनतेला पाठिंबा बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळाने यंदा १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधून कामकाज केले होते.
संबंधित बातम्या:
कर्नाटकातही लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू होणार, येडियुरप्पांचे मंगळुरुमध्ये वक्तव्य
कर्नाटक भाजपमध्ये मोठी फूट; पंतप्रधान मोदी येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवणार?
सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत, याद राखा! कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल
शिवरायांचा पुतळा हटवणारा बोलवता धनी जगाने पाहिला, वर्तन बदला, खोतकरांचा भाजपला इशारा
Shivaji Maharaj | कुठं पुतळ्याचं दहन, तर कुठं कर्नाटक सरकारला बांगड्यांचा हार, शिवभक्त आक्रमक
(Karnataka govt will setup Maratha Development Authority announcement by cm bs yeddyurappa)