105 वर्षांच्या पणजीची जिद्द लय भारी, 96 वर्षांनी चौथीची परीक्षा दिली!
105 वर्ष वय असलेल्या केरळमधील भगिरथी अम्मा साक्षरता अभियाना अंतर्गत चौथीच्या परीक्षेला बसल्या.
तिरुअनंतपुरम : शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, हे आपण बरेच वेळा पाहतो. चाळिशीतले आई-वडील मुलांच्या जोडीने दहावी-बारावी झाल्याच्या घटना नवीन नाहीत. अगदी साठी-सत्तरीतही जिद्दीने पदवी मिळवणारे आजी-आजोबा तुम्ही पाहिले असतील. पण केरळमधील शंभरी पार केलेल्या वयोवृद्ध आजी, किंबहुना पणजीची शिक्षणाची जिद्द (Grandma appears Fourth Standard Exam) तुम्हाला थक्क करुन सोडेल.
105 वर्ष वय असलेल्या केरळमधील भगिरथी अम्मा चौथीच्या परीक्षेला बसल्या. केरळमधील कोलम जिल्ह्यातील थ्रिक्करुवा गावात ही प्रेरणादायी महिला राहते. इयत्ता चौथीशी तुल्यबळ असलेल्या परीक्षेला त्या मंगळवारी बसल्या होत्या. केरळ राज्यातील
बालवयातच कौटुंबिक जबाबदारी खांद्यावर पडल्यामुळे भगिरथी अम्मांना शिक्षण सोडण्यावाचून गत्यंतर नव्हतं. धाकट्या भावाच्या जन्मावेळी बाळंतपणात त्यांच्या आईला मृत्यूने गाठलं. त्यामुळे लहान भावंडांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली.
Kollam: 105-year old woman Bhageerathi Amma appeared for 4th standard equivalent examination conducted under Kerala State Literacy Mission. #Kerala pic.twitter.com/0jc6WNf78S
— ANI (@ANI) November 20, 2019
लग्नानंतरही भगिरथी अम्मांच्या दुर्दैवाचे दशावतार सुरुच होते. अवघ्या तिशीतच अम्मांच्या माथी वैधव्य आलं. पतीच्या निधनानंतर त्यांच्या पदरात चार मुली आणि दोन मुलं होती. सहा लेकरांची पोटं भरण्याची जबाबदारी पार पडताना अम्मा यांना चांगलीच कसरत करावी लागली होती.
जवळपास 96 वर्षांपूर्वी शिक्षणाशी सुटलेलं नातं त्यांनी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला. केरळ साक्षरता अभियानात त्या सहभागी झाल्या आणि त्यांनी पुन्हा अक्षरं गिरवण्यास सुरुवात केली. भगिरथी अम्मा या वयाच्या एकशे पाचाव्या वर्षी पुन्हा शिक्षणाशी नाळ जोडणाऱ्या कदाचित सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असाव्यात.
वयाची शंभरी ओलांडल्यानंतरही तल्लख स्मरणशक्ती, दृष्टी आणि श्रवणशक्ती अबाधित असल्यामुळे शिकताना त्यांना अडथळे आले नाहीत. भगिरथी अम्मा त्यांची 67 वर्षांची कन्या थन्कमानी अम्मा यांच्यासोबत राहतात.
भगिरथी अम्मा यांना तोडीस तोड स्पर्धा देणारी एक महिला केरळमध्ये आहे. 96 वर्षांच्या कार्थ्यायनी अम्मा यांनी साक्षरता अभियानात शंभरपैकी 98 गुण मिळवले आहेत. त्यांना राष्ट्रकुल सद्भावना राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. आता भगिरथी अम्मांसमोर पैकीच्या पैकी गुण (Grandma appears Fourth Standard Exam) मिळवण्याचं आव्हान आहे.