कुत्रा चावल्याने म्हशीचा मृत्यू, दूध प्यायलेले 200 जण रुग्णालयात
कोल्हापूर शहराजवळील करवीर तालुक्यातील शिये गावात दोन दिवसांपूर्वी एका म्हशीचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालात रेबीज रोगामुळे म्हशीचा मृत्यू झाल्याचे कळताच म्हशीचे दूध प्यायलेल्या शेकडो ग्राहकांची तारांबळ उडाली.
कोल्हापूर : कोल्हापूर शहराजवळील करवीर तालुक्यातील शिये गावात दोन दिवसांपूर्वी एका म्हशीचा मृत्यू झाला (Buffalo Dies Due To Rabies). वैद्यकीय अहवालात रेबीज रोगामुळे म्हशीचा मृत्यू झाल्याचे कळताच म्हशीचे दूध प्यायलेल्या शेकडो ग्राहकांची तारांबळ उडाली. त्यांनी रेबीजची लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली. या प्रकारामुळे गावात भीतीचं वातवरण पसरलं आहे (Rabies Vaccination).
शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या करवीर तालुक्यातील शिये गाव आहे. या गावातील शिये गावातील हनुमान नगर येथील एका शेतकऱ्याच्या म्हशीला सहा महिन्यांपूर्वी पिसाळलेला कुत्रा चावला होता. त्या म्हशीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालात त्या म्हैशीला रेबीज झाल्याचे समोर आले. गावातील शेकडो ग्रामस्थ या म्हशीचं दूध वापरत होते. त्यामुळे रेबीजमुळे म्हशीचा मृत्यू झाला हे कळताच ग्रामस्थांची बोबडीच वळली. भीतीपोटी शेकडो ग्रामस्थांनी रेबीजची लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली. तब्बल 200 ग्रामस्थांनी रेबीजची लस घेतली असल्याची माहिती आहे.
दरम्यान, नागरिकांनी जर दूध उकळून घेतलं असेल, तर कोणताही धोका नाही. मात्र, कच्च्या दुधाचं सेवन केलं असेल, तर संबंधितांना रेबीजची लागण होण्याची शक्यता आहे, असं जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे ज्या लोकांनी या म्हशीचे कच्चे दूध प्यायले असेल, त्यांना रेबीजची लस घेण्याची आवश्यकता आहे. ही लस आरोग्य उपकेंद्रात मोफत उपलब्ध आहे, असंही आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं.
तसेच, खबरदारी म्हणून गोकूळ दुध संघाच्यावतीने गावातील जनावरांची तपासणी करण्यात येणार आहे.